पुष्कर जोग सध्या ‘मुसाफिरा’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो पहिल्यांदाच अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता अशा तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना प्रेक्षकांना दिसणार आहे. पुष्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. मनोरंजनसृष्टीसह अनेक सामाजिक विषयांवर अभिनेता आपली परखड मतं मांडत असतो. पुष्करने त्याला नुकताच आलेला अनुभव इन्स्टाग्रामवर सांगत एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
दोन दिवसांपूर्वी केतकी चितळेने महापालिकेचे कर्मचारी घरी जातीय सर्वेक्षण करायला आल्याचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं होतं. आता असाच काहीसा अनुभव पुष्करने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात…
पुष्कर जोग त्याच्या पोस्टमध्ये लिहितो, “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार” अभिनेत्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
हेही वाचा : “आपलं आरोग्य चांगलं नसेल तर…”, आजारपणानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आला श्रेयस तळपदे; म्हणाला, “मी भोगलंय…”
दरम्यान, पुष्कर जोगच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘बिग बॉस’ मराठी कार्यक्रमामुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला. त्याने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. लवकरच पुष्कर जोगचा ‘मुसाफिरा’ चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.