अभिनेता पुष्कर जोग(Pushkar Jog) अनेकदा मराठी चित्रपटांवर अन्याय होतोय, असे बोलताना दिसतो. तसेच मराठी चित्रपटांसाठी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम करीत असलेल्या सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असेही पुष्करने वक्तव्य केले आहे. नुकताच पुष्कर जोग दिग्दर्शित ‘हार्दिक शुभेच्छा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २१ मार्च २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात पुष्कर जोगसह अभिनेत्री हेमल इंगळे प्रमुख भूमिकेत आहे. आता अभिनेत्याने ‘सिकंदर’ चित्रपटामुळे ‘हार्दिक शुभेच्छा’चे शो काढल्याने संताप व्यक्त केला आहे.
पुष्कर जोग काय म्हणाला?
पुष्कर जोगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली. त्यामध्ये त्याने लिहिले, ” ‘सिकंदर’सारखा चित्रपट आला की, आमची दुसऱ्या आठवड्यात चाललेली फिल्म काढायची. छान. खरं तर मी गुंड असतो, तर बरं झालं असतं. निदान राग काढता आला असता.” पुढे पुष्कर जोगने लिहिले, “यासाठी कोणी कधीच काहीच करीत नाही, याचा अभिमान वाटतो.” अभिनेत्याने जोग बोलणार हा हॅशटॅगही वापरला असून, चित्रपटातील इतर कलाकारांना त्याने टॅग केले आहे.
पुष्कर जोग जितका त्याच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो, तितकाच तो त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीदेखील ओळखला जातो. अनेकदा त्याची चर्चा होताना दिसते. विविध विषयांवर तो चित्रपट बनवीत असतो. नुकत्याच एका मुलाखतीत हेमल इंगळेने अभिनेत्याने कौतुक केले होते. परदेशांतही पुष्करने मराठी माणसांना जोडून ठेवले आहे. त्यामुळे त्या माणसांनी वेळोवेळी मदत केली, याचा अनुभव चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आल्याचे तिने म्हटले होते. तर यावर पुष्कर जोगने माणसे जोडून ठेवणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले होते. पुष्कर जोगच्या चित्रपटांचे शूटिंग परदेशांत होत असल्यानेदेखील त्याच्या चित्रपटांची चर्चा रंगताना दिसते. हार्दिक शुभेच्छा या चित्रपटात पुष्कर जोग आणि हेमल इंगळे यांच्याबरोबरच पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्वीक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे व किशोरी अंबिये यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोगने केले आहे.

सलमान खान व रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला सिकंदर हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २६ कोटींची कमाई केली आहे. येणाऱ्या काळात हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.