लोकप्रिय शास्त्रीय गायक राहुल देशपांडे( Rahul Deshpande)हे त्यांच्या गाण्यांसाठी सुप्रसिद्ध आहेत. गायनाबरोबरच ते अभिनय करतानाही दिसतात. राहुल देशपांडे यांनी ‘अमलताश’, ‘पुष्पक विमान’, ‘मी वसंतराव’, ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटांत काम केले आहे. त्यांची देव चोरिला, हा रंग चढू दे अशी अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. आता मात्र राहुल देशपांडे त्याच्या गाणे किंवा चित्रपटामुळे नाही, तर त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत नाना पाटेकरांबाबत (Nana Patekar) एक वक्तव्य केले आहे. ते नेमकं काय म्हणाले आहेत ते जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझ्यावर त्यांचं इतकं प्रेम आहे की…

राहुल देशपांडे यांनी नुकतीच अमोल परचुरे यांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘मी वसंतराव’ हा चित्रपट पाहिल्यानंतर नाना पाटेकरांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल राहुल देशपांडे यांनी खुलासा केला. त्यांनी म्हटले की, नानांनी तो चित्रपट पाहिला तेव्हा त्यांनी मला म्हटले की, तू जसा गातोस, तसाच अभिनय करतोस वगैरे. माझ्यासाठी हे लोक फार महत्त्वाचे आहेत. विशेषत: नाना खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे चुकून जर मला एखाद्या वेळेस चांगल्या अर्थानं शिवी दिली नाही, तर मला असं वाटतं की काहीतरी चुकतंय की काय? माझ्यावर त्यांचं इतकं प्रेम आहे की, मी त्यांना प्रत्येक गोष्ट आधी सांगतो. मी अमुक एखादी गोष्ट करतोय, अशा गोष्टी मी त्यांना सांगतो. मला आठवतंय नाना पहिल्या स्क्रीनिंगला आले होते. ते म्हणाले की, मला तुमच्याशी बोलायचं नाही. मी वही आणि पेन घेऊन बसणार आहे. आम्हाला म्हणजे मला व निपुणला टेन्शन आलं. तो चित्रपट संपल्यानंतर त्यांच्याजवळ असलेलं पान बघितलं, तर त्यावर काहीतरी चित्र काढून ठेवलं होतं. ते आम्हाला म्हटले की, काहीच सांगण्यासारखं नाही. खूप सुंदर चित्रपट बनवला आहे. अप्रतिम गायला आहेस, सुंदर म्युझिक आहे, असे म्हणत नाना पाटेकरांनी राहुल देशपांडे यांच्या अभिनयाचे कौतुक केल्याची आठवण त्यांनी सांगितली.

मी वसंतराव हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्याला फारसे यश मिळाले नाही. त्यावर बोलताना राहुल देशपांडे यांनी म्हटले की, मला माहीत नाही की असं का झालं. हा चित्रपट प्रदर्शित करण्याआधी आम्ही महाराष्ट्र पिंजून काढला होता. खूप कार्यक्रम केले होते. त्यावेळी लोकांनी खूप गर्दी केली होती. गोव्यात चित्रपट लागलाच नाही. मडगावमध्ये कुठेतरी रात्रीचा शो लावला होता. मग, लोक चित्रपट पाहण्यासाठी जातील, अशी अपेक्षा आपण कशी ठेवू शकतो. डिस्ट्रिब्युशनवर आपला कंट्रोलच नसतो. त्यांची काय गणितं असतात हे आपल्याला कळत नाही. ते बरोबर का चूक हेही आपल्याला कळत नाही. त्यावर आपण भाष्य करू शकत नाही. कारण- आपण त्यामध्ये सुज्ञ नाही आहोत. पण, अनेक लोकांनी मला हा चित्रपट चांगल्या चित्रपटांपैकी एक असल्याचे फोन करून सांगितले, अशी आठवण राहुल देशपांडे यांनी सांगितली आहे.