भगवे वादळ निर्माण करणाऱ्या नव्या युगातील मावळ्यांची कथा सांगणारा आशिष नेवाळकर, मनोज येरुणकर दिग्दर्शित ‘हरीओम’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. छत्रपतींचे निष्ठावंत मावळे म्हणून तानाजी व सूर्याजी हे दोघे भाऊ कायम स्वराज्य रक्षणासाठी प्राणपणाने लढत राहिले. शूरवीर तानाजी धारातीर्थी पडल्यावर सुर्याजीने युद्धभूमी सांभाळली. याच इतिहासाची व बंधुप्रेमाची पुनरावृत्ती करणारा संदेश ‘हरिओम’ चित्रपटातून देण्यात आला आहे. श्री हरी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती आणि कथा हरिओम घाडगे यांची आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
दादर मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मराठी चित्रपट ‘हरिओम’च्या चित्रपटातील कलाकारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे ‘हरिओम’ चित्रपटाचे कौतुक करत म्हणाले, “‘हरिओम’ चित्रपटासारखा ऐतिहासिक चित्रपट व निर्माते तयार होणे गरजेचे आहे.” राज ठाकरे यांच्या वतीने चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आशीर्वाद व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
राज ठाकरे यांचा आशीर्वाद व शुभेच्छा मिळाल्यानंतर अभिनेता व निर्माता हरिओम घाडगे यांनी, “‘हरिओम’ माझा प्रथम मराठी चित्रपट आहे व ‘हरिओम’ चित्रपट नवीन पिढीला प्रेरणादायी ठरेल”, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिवतीर्थ येथे मुख्य अभिनेता व निर्माता हरिओम घाडगे, दिग्दर्शक आशिष नेवालकर, मनोज येरूनकर व हरिओम चित्रपटातील कलाकार तसेच मराठी चित्रपट निर्माते फैजल भाई पोपेरे हजर होते.
आणखी वाचा- रायगडच्या दुर्गम भागातील उंबरठच्या सुपुत्रांनी केली दमदार चित्रपटाची निर्मिती
दरम्यान कोकणातील निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवणारा ‘हरीओम’ हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. निरंजन पेडगावकर, प्रशांत, अमोल कोरडे, गणेश, राहुल यांनी चित्रपटातील गाण्यांना शब्दबद्ध केले असून या श्रवणीय गाण्यांना निरंजन पेडगावकर यांनी संगीत दिले आहे. तर या चित्रपटात हरिओम घाडगे, गौरव कदम, सलोनी सातपुते आणि तनुजा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘हरिओम’च्या क्रिएटिव्ह डायरेक्टरची धुरा राज सुरवडे यांनी सांभाळली आहे.