‘अथांग’ या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. एकूणच कलाविश्व आणि ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल राज ठाकरे यांनी मनमोकळेपणाने आपली मतं मांडली. भविष्यात स्वतःवरच बायोपिक आला तर त्यात स्वतःची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारावी? या प्रश्नचं त्यांनी फारच मजेदार उत्तर दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांना “तुमच्या स्वतःच्या आयुष्यात एवढा ड्रामा आहे, त्यात राजकारण आहे, लव्हस्टोरी आणि आयुष्यातले इतर चढउतार आहेत तर मग तुमच्यावर जर बायोपिक निघाला तर तुमची भूमिका कोणी साकारलेली पाहायला तुम्हाला आवडेल?” असा प्रश्न विचारला. ज्यावर राज ठाकरे यांनी फारच मजेदार उत्तर दिलं. राज ठाकरे यांचं उत्तर ऐकल्यानंतर तेजस्विनीलाही हसू आवरेनासं झालं.

आणखी वाचा- “वेब सिरीजमध्ये शिव्या देण्याला माझा विरोध नाही पण…”; राज ठाकरेंचं OTT सेन्सॉरशिपवर रोखठोक मत

राज ठाकरे म्हणाले, “मला घरी जाऊन पहिलं बायकोला विचारावं लागेल, तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. मी पूर्वी जेव्हा सलूनमध्ये जायचो तेव्हा आजूबाजूला असलेल्या लोकांना पाहायचो आणि ते जेव्हा आरशात पाहायचे तेव्हा त्यांच्या स्वतःच्या दिसण्याबद्दल काही कल्पना असायच्या. तसं मला स्वतः कसा दिसतो हे आरसा सोडला तर मला माहीत नाही. त्यामुळे ती भूमिका कोण करू शकेल हे मला माहीत नाही.” यावर तेजस्विनीलाही हसू आवरेनासं झालं. त्यानंतर तिने राज ठाकरे यांना, “पण असा बायोपिक बनवायचा झाला तर आम्हाला तुम्ही ती संधी द्याल का?” असा प्रश्न विचारला ज्यावर ते म्हणाले, “तसं काही असे तर करा माझी काहीच हरकत नाही. पण काही नसेल तर कशाला उगाच करायचं काही.”

राज ठाकरेंच्या बोलण्यावर तेजस्विनीने पुन्हा त्यांना, “पण तुमच्या आयुष्यात त्या सर्व गोष्टी आहेत ज्या एका बायोपिकसाठी आवश्यक आहेत.” असं स्पष्ट केलं. यावर राज ठाकरे त्वरीत म्हणाले, “आता माझी लव्हस्टोरी तुम्ही कुठून काढली माहीत नाही.” राज ठाकरे यांच्या बोलण्यावर तेजस्विनीने बायकोबरोबरची लव्हस्टोरी असं स्पष्टीकरण दिलं. त्यावर ते म्हणाले, “अच्छा तेच होतं का? मला वाटलं दुसरी कोणती लव्हस्टोरी जी मला माहीत नाही.”

आणखी वाचा- “मी राजकारणात अपघाताने आलो, माझं पाहिलं पॅशन…”; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

राज ठाकरे पुढे म्हणाले, “आजकाल बायोपिकचं पेव फुटलंय. पण भारतात जर सर्वात बेस्ट बायोपिक जर कोणाचा होऊ शकत असेल तर तो इंदिरा गांधी यांचा आहे. त्यांचा सपूर्ण कार्यकाळ हा रोलर कोस्टर राइडसारखा आहे. या व्यतिरिक्त एखादी व्यक्ती मला आवडली म्हणून त्याचा बायोपिक केला असं होऊ शकत नाही. बायोपिकसाठी व्यक्तीची निवड योग्य असायला हवी. त्यामुळे माझ्यावर बायोपिक येऊ शकतो की नाही हे मला माहीत नाही.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray open up on making biopic on his own life and who will play his role mrj
Show comments