रामानंद सागर दिग्दर्शित ‘रामायण’ ही टीव्हीवर प्रदर्शित होणारी मालिका विशेष गाजली. आजही या मालिकेप्रती प्रेक्षक प्रेम व्यक्त करताना दिसतात. इतकेच नव्हे तर यामध्ये राम-सीतेची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांप्रती प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा आहे. त्यांना राम, सीता, लक्ष्मण या रूपात प्रेक्षक पाहतात. अरुण गोविल(Arun Govil) यांनी ‘रामायण’ या मालिकेत राम ही भूमिका साकारली होती, तर दीपिका चिखलिया यांनी सीता ही भूमिका साकारली होती. अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी घराघरांत राम-सीता म्हणून विशेष जागा मिळवली. या जोडीची लोकप्रियता आजतागायत कायम आहे. आता हे कलाकार ३७ वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एका चित्रपटात हे दोन्ही कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. श्रीरामनवमीच्या निमित्ताने या दोघांचे एक आकर्षक पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ‘वीर मुरारबाजी.. पुरंदर की युद्धगाथा’ या हिंदी चित्रपटात ही जोडी छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या पोस्टरमधील त्यांचा मराठमोळा लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाची निर्मिती भाऊसाहेब आरेकर यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केले आहे.

ऐतिहासिक चित्रपटात एकत्रित काम करण्याचा योग या निमित्ताने जुळून आला असून या भूमिकेसाठी आम्ही तितकेच उत्सुक होतो, असं मत अरुण गोविल व दीपिका चिखलिया यांनी व्यक्त केले आहे. छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांची भूमिका करायला मिळणं आमच्यासाठी खूपच आनंददायी होतं. ज्या उत्तुंग व्यक्तिमत्वांनी आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, अशी भूमिका साकारताना सोबत मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच असते, असे मत या कलाकारांनी व्यक्त केले आहे.

पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवणाऱ्या नरवीर मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा ‘वीर मुरारबाजी…पुरंदर की युद्धगाथा’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.