सध्या मराठी सिनेसृष्टीत परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचा बोलबोला सुरू आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, मायरा वायकुळ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘नाच गं घुमा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. इतर कलाकार मंडळींसह प्रेक्षक कौतुक करत आहेत. अशातच ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याने नम्रता संभेरावसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ‘नाच गं घुमा’ चित्रपटातील तिच्या कामाचं अभिनेत्याने भरभरून कौतुक केलं आहे.
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कार्तिक म्हणजे अभिनेता आशुतोष गोखलेने नम्रता संभेरावसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ‘नाच गं घुमा’ चित्रपटातील नम्रताच्या भूमिकेचा पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे, “मिळालेल्या संधीचं सोनं करणं म्हणजे काय हे ती संधी शोधू पाहणाऱ्या प्रत्येक कलाकाराने नम्रता संभेराव हिचं ‘नाच गं घुमा’ चित्रपटामधलं काम बघून शिकावं. नम्रता ही एक चांगली अभिनेत्री आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. पण एखाद्या कामाचं, व्यक्तिरेखेचं आणि प्रामुख्याने मिळालेल्या त्या एका संधीचं मोल असणं म्हणजे काय हे तिने केलेल्या कामात जो खरेपणा, जो प्रामाणिकपणा आहे त्यातून जाणवत राहतं.”
“करावं तितकं कौतुक कमीच…खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा नम्रता. या अशा अनेक संधी, अनेक व्यक्तिरेखा तुला मिळत राहो आणि त्या तुझ्याकडून इतक्याच खऱ्या आणि परिणामकारक होत राहो हीच सदिच्छा,” असं आशुतोषने लिहिलं आहे.
हेही वाचा – Video: “वजन वाढलं तर?”, मराठी अभिनेत्रीला आंब्यांवर ताव मारताना पाहून नवऱ्याचा प्रश्न, म्हणाली…
आशुतोष व्यतिरिक्त मराठी सिनेसृष्टीतील इतर कलाकार मंडळींनी देखील नम्रता संभेरावच्या कामाचं कौतुक करण्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिल्या आहेत. त्यामुळेच सध्या नम्रता संभेराव चांगलीच चर्चेत आली आहे.
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेता अमित भानुशाली ‘या’ मराठी अभिनेत्रीला म्हणाला करीना कपूर, फोटो व्हायरल
दरम्यान, आशुतोष गोखलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेनंतर त्याचं ‘जर तर ची गोष्ट’ नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या नाटकात आशुतोषबरोबर अभिनेता उमेश कामात, प्रिया बापट, पल्लवी पाटील काम करत आहेत. ‘जर तर ची गोष्ट’ नाटकासाठी आशुतोषला काही महिन्यांपूर्वी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.