मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय निर्माते-दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांना ओळखलं जातं. ‘टाईमपास’, ‘बालक पालक’ ते नुकतीच प्रदर्शित झालेली सुश्मिता सेनची ‘ताली’ सीरिज त्यांच्या प्रत्येक कलाकृतीचं प्रेक्षकांना भरभरून कौतुक केलं. वैयक्तिक आयुष्यात रवी जाधव यांनी ५ डिसेंबर १९९८ मध्ये मेघना यांच्याशी लग्न केलं. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शकाने लग्नाचा २५ वा वाढदिवस जवळचे नातेवाईक व कलाक्षेत्रातील मित्रमंडळीबरोबर साजरा केला. याचा सुंदर व्हिडीओ रवी जाधव यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
रवी जाधव यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस ५ डिसेंबरला साजरा करण्यात आला. यावेळी दिग्दर्शकाने पत्नी मेघनाला खास सरप्राईज दिलं होतं. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जवळचे मित्रमंडळी व कुटुंबीयांना लहानशी पार्टी देण्यात आली. या पार्टीची झलक त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहे. याला त्यांनी “२५ वर्षे साधी गोष्ट नाही, सहज तर नाहीच नाही. मग जलवा सेलिब्रेशन तर होणारच ना!!!” असं कॅप्शन दिलं आहे. तसेच “सर सुखाची श्रावणी…” हे गाणं त्यांनी या व्हिडीओवर लावलं आहे.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या पार्टीत आकर्षक व लव्ह थीमनुसार सजावट करण्यात आली होती. यावेळी रवी जाधव यांनी पत्नीसह रोमँटिक कपल डान्स केला. दोघांनी एकत्र केक कापून आनंद साजरा केला. सध्या चाहत्यांसह नेटकरी रवी जाधवांच्या व्हिडीओवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
रवी जाधव आणि मेघना यांची लव्हस्टोरी सुद्धा फारच फिल्मी आहे. मेघना म्हणजे रवी जाधव यांच्या जवळच्या मित्राची बहीण. मित्राच्या घरी येणं-जाणं वाढल्यावर त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी दिग्दर्शकाने मेघना यांना लग्नाची मागणी घातली होती. होकार देण्यापूर्वी मेघना यांनी पूर्ण १ महिना विचार केला होता. यानंतर सासरेबुवांनी घातलेल्या अटीनुसार त्यांनी प्रचंड मेहनत करून मुंबईत घर घेतलं आणि मेघनाशी लग्नगाठ बांधली. यांच्या सुखी संसाराला आता २५ वर्षे पूर्ण झाली असून या जोडप्याला आता एक मुलगा आहे.