मराठी सिनेविश्वातील बरेच कलाकार हे मूळचे कोकणातले आहेत. गणपती असो किंवा शिमगा हे सगळे कलाकार वेळात वेळ काढून आवर्जुन कोकणात जातात किंवा गावच्या परंपरेनुसार मुंबईत हे सण साजरे करतात. निखिल बने, माधवी निमकर, प्रतिक्षा मुणगेकर, प्रथमेश परब, संतोष जुवेकर या सगळ्या कलाकारांचं गाव कोकणात आहे. याचप्रमाणे, मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांचं गाव देखील कोकणातील संगमेश्वर येथे आहे. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मराठीसह हिंदी कलाविश्वात आपला ठसा उमटवणारे लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांना ओळखलं जातं. ‘मैं अटल हूं’, ‘ताली’, ‘बालक पालक’, ‘टाईमपास’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. त्यांनी कोकणातील शिमगोत्सवाची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
शिमग्यात कोकणात ग्रामदेवतेची पालखी निघते. गावातील प्रत्येक घरात पालखीचं दर्शन घेण्यात आलं की, परंपरेनुसार पालखी नाचवली जाते. या दिवसांत घरोघरी गोडाधोडाचं नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. तसेच गावातील स्त्रिया घरोघरी पालखी आल्यावर ओटी भरून पूजा करतात. या सणानिमित्त प्रत्येक चाकरमानी मुंबईहून कोकणात जातात.
रवी जाधव यांनी पालखी सोहळ्याचा खास व्हिडीओ शेअर करत त्याला “माझ्या कोकणातील गावची पालखी” असं कॅप्शन दिलं आहे. रत्नागिरी येथील संगमेश्वर तालुक्यात कासे हे त्यांचं गाव आहे. माघी गणेशोत्सवाला त्यांनी गावच्या घराची झलक चाहत्यांना दाखवली होती.