आपल्या मुलांनी उच्चशिक्षित होऊन स्वत:ची सगळी स्वप्न पूर्ण करावीत अशी इच्छा प्रत्येक पालकांची असते. आपल्या मुलांना यशस्वी होताना पाहणं हे प्रत्येक आई-बाबांचं स्वप्न असतं. सर्वसामान्य माणसांप्रमाणे कलाकारांमंडळींच्या देखील आपल्या मुलांकडून अनेक अपेक्षा असतात. बहुतांश कलाकारांची मुलं सध्याच्या घडीला परदेशातील विविध नामांकित विद्यापीठांमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता प्रसाद ओकच्या मुलाचं परदेशात शिक्षण पूर्ण झालं. त्याच्या पदवी प्रदान सोहळ्याचे फोटो अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
आता या पाठोपाठ मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांच्या मुलाने देखील परदेशातून आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. यासंदर्भात दिग्दर्शकाने काही दिवसांपूर्वीच पोस्ट शेअर करत त्यांच्या सर्व चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. आता नुकताच रवी जाधव यांनी लेकाच्या दीक्षांत समारंभातील खास क्षण सोशल मीडियावर व्हिडीओच्या रुपात शेअर केला आहे.
रवी जाधव लिहितात, “आज माझ्या मुलाने केलेल्या अतुलनीय कामगिरीचा मला खूप जास्त अभिमान वाटतोय. महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात त्याला रंगमंचावर हातात पदवी घेऊन जाताना पाहणं हा क्षण मी कायम माझ्या मनात जपून ठेवेन. त्याची मेहनत, चिकाटी, डेडिकेशन या सगळ्या गोष्टींचं हे फळ आहे. अभिनंदन अथर्व तू खूप मोठा टप्पा आज पार केला आहे.”
“आज तुझं स्मितहास्य जेवढं खुललं होतं… तेवढंच तुझं भविष्य उज्ज्वल असेल. आयुष्यात अशाच अनेक गोष्टी मिळवत राहा. आमचं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.” अशी पोस्ट रवी जाधव यांनी लेकासाठी लिहिली आहे.
रवी जाधव यांच्या मुलाने OCAD युनिव्हर्सिटी, कॅनडातून डिजिटल फ्युचर्समध्ये बॅचलर ऑफ डिझाईन (ऑनर्स) यामध्ये आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे.
दरम्यान, दिग्दर्शकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर रवी जाधव हे मराठी व हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. ‘नटरंग’, ‘टाईमपास’, ‘न्यूड’, ‘बालगंधर्व’ अशा दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. गेल्यावर्षी त्यांनी दिग्दर्शित केलेली ‘ताली’ ही वेबसीरिज प्रचंड गाजली. यामध्ये विश्वसुंदरी सुष्मिता सेनने प्रमुख भूमिका साकारली होती. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय रवी जाधव यांचं सुद्धा सर्वत्र कौतुक झालं होतं.