ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं गेल्यावर्षी जुलै महिन्यात निधन झालं. त्यांचा मृतदेह १५ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये आढळला होता. त्या घरात ते तीन दिवस मृतावस्थेत पडून होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. त्यांच्या मृत्यूने कुटुंबीयांसह कलाविश्वातील सर्वांनाच धक्का बसला होता. रवींद्र महाजनींचं निधन झाल्यावर आता जवळपास ६ महिन्यांनी त्यांची पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित केलं आहे.
माधवी महाजनी यांच्या पुस्तकाचं नाव ‘चौथा अंक’ असं आहे. नुकताच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना माधवी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
माधवी महाजनी म्हणाल्या, “आयुष्यात खूप घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे सगळंच सांगणं कठीण होतं. त्यानंतर जवळचे नातेवाईक व माझ्या काही मैत्रिणींनी हे पुस्तक लिहिण्याचा आग्रह मला केला. सुरुवातीला मी तयार नव्हते पण, प्रेक्षकांसमोर मोकळं व्हावं असं मलाही जाणवलं. या पुस्तकातून माझा कुणालाही नायक किंवा व्हिलन बनवायचा हेतू नाही. जे माझ्या आयुष्यात खरं खरं घडलंय ते सर्व मी लिहून काढलंय.”
“पुस्तकात जर काही गोष्टी लपवल्या असत्या, तर ते आत्मचरित्र झालं नसतं. फक्त चांगल्या घटना लिहायच्या असत्या, तर ती कादंबरी झाली असती. त्यामुळे मी सगळ्या खऱ्या घटना लिहिल्या आहेत. पण, यामागे माझा हेतू अगदी चांगला आहे. माझे दोष, त्यांचे दोष या सगळ्या गोष्टी मी चांगल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझं हे पुस्तक फार आधीच लिहून झालं होतं. पुस्तक छापायला मी देणार होते. पण, त्याआधीच त्यांचं निधन झालं. त्यानंतर माझ्या जवळच्या लोकांनी माझ्या विचारांना आणखी दिशा दिली. पुढे, मी पुस्तकात त्यांच्या निधनानंतर घरात बदललेली परिस्थिती व त्यानंतरचे माझे विचार या गोष्टी देखील लिहिल्या.” असं माधवी महाजनी यांनी सांगितलं.
हेही वाचा : सुपरहिट चित्रपट, अपघातात स्मृती गेली अन्…; २९ दिवस कोमात होती ‘आशिकी’ फेम अभिनेत्री, तो प्रसंग आठवत म्हणाली…
दरम्यान, पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला त्यांचा लेक गश्मीर महाजनी देखील उपस्थित होता. त्याने या पुस्तकाची प्रस्तावना सर्वांना वाचून दाखवली. तसेच या पुस्तकाचं नाव ‘चौथा अंक’ का ठेवलं याची माहिती देखील अभिनेत्याने प्रेक्षकांना दिली.