Renuka Shahane : ‘सर्कस’, ‘सुरभि’, ‘हम आपके है कौन’ या चित्रपटांमुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. अभिनेत्री-दिग्दर्शिका रेणुका शहाणे यांनी टीव्हीपासून मोठ्या पडद्याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. २००१ मध्ये त्यांनी आशुतोष राणांबरोबर लग्न केलं. दोघांकडे आदर्श जोडपे म्हणून पाहिले जाते. दोघे अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल भाष्य करताना दिसतात. अशातच रेणुका यांनी आशुतोष यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर रूढी पाळणं आणि मूल्य जपण्याबद्दल भाष्य केलं आहे.
रेणुका यांनी नुकतीच अमोल परचुरे यांच्या ‘कॅचअप’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांना ‘आशुतोष राणांबरोबर लग्न झाल्यानंतर रूढी पाळणं आणि मूल्य जपणं हे तुम्हालाही करावं लागलं होतं का?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याचे उत्तर देत त्या म्हणाल्या की, “हो नक्कीच, प्रश्नच नाही. माझ्यासाठी तो खूपच मोठा बदल होता. म्हणजे मी तिकडे अजूनही डोक्यावर पदर घेते. माझ्या घरात हे शक्यच नाही.”
पुढे रेणुका यांनी असं म्हटलं की, “माझ्या मित्र-मैत्रिणींमध्येही ते वातावरण नव्हतं की, पदर घेतलं जाणं किंवा ते संस्कारात येतं हे मानलंच जात नाही. पण माझे सासरे आणि परिवाराचे आध्यात्मिक गुरु असल्याकारणाने तिकडे काही गोष्टी पाळल्या जायच्या. एकदा तुम्ही एखाद्या कुटुंबातल्या होता, म्हणजे मी झाले होते आणि ती माझी इच्छा होती. माझ्यावर कोणी ते लादलं नाही. राणाजींनी सुद्धा कधी असं सांगितलं नाहे की, तू हे केलंच पाहिजे. आशीर्वाद घे किंवा हेच कर आणि तेच कर.”
यापुढे त्यांनी सांगितलं की, “मला असं वाटलं की, एक तर मी अभिनेत्री आणि सगळ्यांनी माझा ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट अनेकदा पाहिलाच होता. त्यामुळे एक अंतर तयार होतं. ही कोणीतरी मुंबईहून आली आहे आणि मला तसं नको होतं. मी बऱ्याच वर्षांपासून त्यांच्याबरोबर होते. त्यामुळे प्रांत आणि भाषांमधले फरक गळून पडले. माझ्या जाऊबाई अगदी खास मैत्रिणी आहेत. आम्ही खूप मज्जा करतो.”
यानंतर रेणुका शहाणेंनी असं म्हटलं की, “मी माझा आडमुठेपणा केला असता किंवा माझी मूल्ये मला महत्त्वाची आहेतच. पण मग आपण तो बदल आपल्या कुटुंबात करूयाना. आता मी बघते की, तिकडे ती पद्धत राहिली नाही. आमच्या सुना आल्या आहेत, त्या पदर वगैरे घेत नाहीत किंवा आम्ही त्यांना म्हणतदेखील नाही. त्या अगदी जीन्स वगैरे घालतात. जशी मी माझ्या घरी आहे तशाच त्या असतात. त्यामुळे मला ते खूप आवडतं की, आपण यात काहीतरी योगदान दिलेलं आहे.”