कोकणातील गणेशोत्सवाची गंमतच न्यारी. गेली अनेक वर्षे मुंबईतून चाकरमानी नित्यनेमाने दरवर्षी गणेशोत्सवाला कोकणात कसे जातात? रेल्वेच्या आरक्षणापासून ते पाऊस, रस्त्यातील खड्डे, दरडी अशा कित्येक आव्हानांचा सामना करत कोकणातील आपल्या घरी पोहोचणाऱ्या या मंडळींची एवढी धडपड नेमकी कशासाठी असते? गणपतीचे आगमन, त्याची प्रतिष्ठापना, पूजाअर्चा, नैवेद्या, आरती-भजन, वाडीतील लोकांकडची अंगतपंगत या सगळ्या गोष्टींचं आकर्षण असतंच. पण त्यानिमित्ताने कुठे कुठे विखुरलेल्या आपल्या नात्यांचे बंध गणपती उत्सवात तरी एकत्र सांधून ठेवण्याची आस त्यामागे असते. उत्सवाच्या आडून आपुलकीच्या नात्यांचे धागे जपण्याच्या या घरोघरच्या प्रयत्नांची सुरेख गोष्ट नवज्योत बांदिवडेकर या तरुण दिग्दर्शकाच्या ‘घरत गणपती’ या चित्रपटात पाहायला मिळते. ‘घरत गणपती’ हा नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर या दिग्दर्शकाचा पदार्पणातील चित्रपट आहे.
कोकणातच काय अन्य कुठल्याही गावात, अगदी शहरातील घरांतही उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या कुटुंबात घडू शकेल अशी गोष्ट या चित्रपटात आहे. घरत कुटुंबीयांच्या गणपतीचं आगमन झालेलं आहे. या कुटुंबाचे आधारस्तंभ माई आणि आप्पा, त्यांचा मोठा मुलगा भाऊ आणि धाकटा शरद, या दोघांच्या बायका, त्यांची मुलं, जावई, येऊ घातलेल्या सुना, लग्नानंतर नवऱ्याबरोबर पटत नाही म्हणून माहेरी आलेली त्यांची कन्या कुसूम आणि तिचा मुलगा अशा तीन पिढ्यांची मंडळी गणरायाच्या सणासाठी घरत कुटुंबात डेरेदाखल झाली आहेत. घर म्हटलं की कुरबुरी आल्या, छोटे-मोठे खटके आले, नात्यांपेक्षाही वरचढ होऊ पाहणारे कधी पैशाचे, तर कधी कष्टांचे अहंगंड आले. याही गोष्टी यानिमित्ताने घरात एकत्र साचल्या आहेत. त्यामुळे यंदा सात दिवसांचा हा शेवटचा गणपती, पुढच्या वर्षी दीड दिवसांचाच ठेवूयात हे माई आणि आप्पांना पटवायचंच असा निर्धार मधल्या पिढीने केला आहे. मी का तू… म्हणत ही गोष्ट माई-आप्पांसमोर येते. एकीकडे गणपती म्हणजे फक्त उत्सव आणि जबाबदारी म्हणून बघणाऱ्या मुलांना आपल्या सगळ्या घराला जोडून ठेवणाऱ्या उत्सवाचं महत्त्व उमगत नाही हे पाहून खंतावलेले माई-आप्पा. दुसरीकडे आई-वडिलांचा हा निर्णय मान्य नसलेली आणि काहीही करून सात दिवसांच्या गणेशोत्सवाची परंपरा पुढेही सुरूच राहिली पाहिजे यासाठी धडपडणाऱ्या तिसऱ्या पिढीची तगमग आपल्याला दिसते. ऐन गणेशोत्सवात उभा राहिलेला कुटुंबाच्या दुराव्याचा पेच कसा सुटतो?, हे मुख्य कथानक आहे. मात्र त्याच जोडीने घरातल्या कर्त्यांकडून अशा वेळी घेतली जाणारी खंबीर भूमिका, आई-वडील आणि मुलांमध्ये नोकरी, शिक्षण ते जोडीदाराची निवड अशा विविध मुद्द्यांवरून असलेला विसंवाद. तो दूर करण्यासाठी तरुण पिढीकडून होणारा प्रयत्न, जुन्याजाणत्यांकडून मिळणारी अनुभवाची शहाणीव आणि इतर कुठल्याही भौतिक सुखांपेक्षा नात्यांचे बंध किती जपले पाहिजेत याची नकळत होणारी जाणीव असे कितीतरी पैलू दिग्दर्शकाने सहज मुख्य कथेच्या ओघात गुंफले आहेत.
हेही वाचा >>> ‘बिग बॉस मराठी’चे नवे पर्व आजपासून
भावनिक नात्यांची गोष्ट हा ‘घरत गणपती’ या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. पण त्याची मांडणी करताना दिग्दर्शकाने हे भावनाट्य अधिक गडद होणार नाही वा अंगावरही येणार नाही याचं भान राखत वास्तविक शैलीच्या जवळ जाणारी पण सोपी सुटसुटीत मांडणी केली आहे. गणेशोत्सवाचा माहौल असल्याने एकंदरीतच सणासुदीचं रंगीबेरंगी, मन उल्हसित करणारं वातावरण, त्यातला आनंद याला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी पटकथा लेखन आणि दिग्दर्शकीय मांडणीतही घेतलेली आहे. त्यामुळे हा चित्रपट अतिशय रडकाही वाटत नाही आणि अगदीच ठोकळेबाज वाटण्याची शक्यताही पुसली गेली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन खुद्द दिग्दर्शक नवज्योतसह आलोक सुतार आणि वैभव चिंचाळकर यांनी केलं आहे. लेखनातली जमेची बाजू लक्षात घेत, कमकुवत ठरू शकतील अशा गोष्टी अत्यंत हुशारीने प्रभावी निर्मितीमूल्यं, उत्तम छायाचित्रण, कलादिग्दर्शन, कानाला सुखावणारं संगीत आणि उत्तम कलाकारांच्या जोरावर दिग्दर्शकाने तोलून धरल्या आहेत.
या चित्रपटाचा विचार करताना याचा अभिनय उणा की त्याचा… हा विचारही मनाला शिवत नाही. मुळात, मुख्य जोडी असलेल्या डॉ. शरद भुताडिया-सुषमा देशपांडे या अनुभवी कलाकारांपासून ते अजिंक्य देव, संजय मोने, अश्विनी भावे, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले अशा कलाकारांचं वेगवेगळ्या नात्यातून एकत्रित येणं हीच पर्वणी ठरली आहे. शिवाय, नव्या पिढीसाठीही भूषण प्रधान, परी तेलंग, समीर खांडेकर, दिल्लीवाली गर्लफ्रेंड म्हणून आलेली हिंदी अभिनेत्री निकिता दत्ता असं नेहमीच्या कलाकारांपेक्षा वेगळं समीकरण यानिमित्ताने एकत्र बांधलं गेलं आहे. त्यामुळे लेखन-मांडणीपासून अभिनयापर्यंत कुठलाही उपदेशात्मक अभिनिवेश नसणारी, नाती जोडून ठेवणं अधोरेखित करणारी सुरेख गोष्ट सांगणारा मनोरंजक अनुभव ‘घरत गणपती’ या चित्रपटातून मिळतो.
दिग्दर्शक – नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर
कलाकार – डॉ. शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, अजिंक्य देव, संजय मोने, अश्विनी भावे, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, भूषण प्रधान, निकिता दत्ता, आशिष पाथोडे, रुपेश बने, राजसी भावे, दिव्यलक्ष्मी मैस्नाम.