इतिहासात डोकावून पाहिलं तर मानवाने नदीकाठी आश्रय घेतला आहे. सिंधू संस्कृती याचं उत्तम उदाहरण आहे. आजही या संस्कृतीचे अवशेष सापडताना दिसून येतात. आज अनेक शतकं होऊन गेली तरी सिंधू नदी वाहतच आहे. अनेक पिढ्या या नदीकाठी होऊन गेल्या आहेत. आज भारतातील प्रमुख शहरात किंवा शहराच्या आसपास एखादी नदी आहेच. नदी आणि मानवी नाते संबंध यांची उत्तम गुंफण बांधणारा अभिनेता जितेंद्र जोशीचा गोदावरी चित्रपट नक्कीच आपल्याला अंतर्मुख करायला लावतो.
नाटक, मालिका वेबसीरिज यामाध्यमातून आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या जितेंद्र जोशीने या चित्रपटात निर्माता, अभिनेता गीतकार अशा तिन्ही भूमिका पार पडल्या आहेत. चित्रपटाची कथादेखील नदीप्रमाणे संथ जाणारी आहे, नदीकाठी एका वाड्यात राहणारे कुटुंब ज्यांचा उदरनिर्वाह हा नदीकाठी असणाऱ्या त्यांच्या मालकीच्या दुकानांमधून भाडेस्वरूपात पैसे जमा करणे. वर्षानुवर्षे देशमुख कुटुंब ही परंपरा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे येत असते. यात प्रत्येक पिढीत होणार संघर्ष, नव्या पिढीचा जितेंद्र जोशी अर्थात निशिकांत हे पात्र ज्याची देशमुख कुटुंबात होणारी घुसमट, नदी, परंपरा, आस्तिकपणा याबद्दलची टोकाची भूमिका, यामुळे त्याने साकारलेले पात्र सतत कुठल्यातरी प्रश्नात अडकलेले दाखवण्यात आले आहे. घरात होणाऱ्या घुसमटीमुळे तो आपल्या कुटुंबाला सोडून वेगळा राहत असतो. रुक्ष स्वभाव असलेल्या निशिकांतचा वडिलांबरोबरचा अबोला मात्र स्वतःच्या मुलीसाठी बायकोसाठी असलेला एक हळवा कोपरा यातून त्याच्या स्वभावाचे कंगोरे दाखवण्यात आले आहेत. सगळं सुरळीत चालू असताना एक घटना निशिकांतच्या आयुष्यात घडते आणि त्याचे मनपरिवर्तन घडून येते. चित्रपटात त्याला भेटणारी माणसं वेगळा दृष्टीकोन देऊन जातात. अखेरीस त्या पात्राचा नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे प्रवास सुरु होतो.
चित्रपटाची कथा मानवी भावभावना, नातेसंबंध, परंपरा, नाशिक शहराचे बदलणारे रूप यावर भाष्य करणारी आहे. तीन पिढ्यांमधील संघर्ष, वैचारिक मतभेद यातून व्यक्तीच्या जाण्याने तिच्याबद्दलची आस्था दाखवणारी आहे. चित्रपटात सर्वात जमेची बाजू म्हणजे अभिनय, छायांकन प्रामुख्याने नाशिक शहरा, गोदावरी नदी, जुने वाडे आणि काळजाचं ठाव घेणारं पार्श्वसंगीत. विक्रम गोखले, संजय मोने, नीना कुलकर्णी प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे, आणि जितेंद्र जोशी यांनी उत्तम अभिनय केला आहे. दिग्दर्शक मोहित टाकळकर, सिद्धार्थ मेनन हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले आहेत. टाळ्या शिट्ट्या पडणारे संवाद यात नाही पात्र प्रत्येकाने साकारलेले पात्र अंतर्मुख करायला लावणारे आहे. प्राजक्त देशमुख आणि दिग्दर्शक निखिल महाजन यांनी कथा उत्तम बांधली आहे. यात विशेष कौतुक करावं लागेल दिग्दर्शकाचे, त्यांनी फ्रेम्स ज्या पद्धतीने दाखवल्या आहेत त्यावरून प्रेक्षकांना हा चित्रपट विचार करण्यास भाग पाडतो. चित्रपटाच्या शेवटी ‘खळ खळ गोदा’ हे गाणे लक्षात राहते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवले आहेत.
अभिनेता जितेंद्र जोशीने हा चित्रपट दिग्दर्शक निशिकांत कामत यांना समर्पित केला आहे. सध्याचे धावते जग, व्हाट्सअँपवर होणारी विचारपूरस यापलीकडे जाऊन मानवी नातेसंबंध, परंपरेसाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.