Rinku Rajguru And Chhaya Kadam : ‘लापता लेडीज’मधील मंजू माई असो किंवा ‘मडगाव एक्स्प्रेस’ चित्रपटातील कंचन कोमडी अभिनेत्री छाया कदम यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. यंदा कान महोत्सवात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारलेल्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाचा गौरव करण्यात आला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून छाया कदम चांगल्याच चर्चेत आहेत.
मराठी नाटक, चित्रपट असा प्रवास करत आता त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांच्या नुकत्याच एका पोस्टने सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये छाया यांनी फिकट हिरव्या रंगाची आणि त्याला बाजूने गुलाबी रंगाची किनार असलेली साडी नेसली आहे.
सुंदर साडी, कानात छानसे झुमके, केसात गजरा हा छाया कदम यांचा मराठमोळा लूक सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. “माझ्यातल्या हसण्याचे व्हावे झोपाळे रोज सजावे माझ्यात माझेच सोहळे” असं कॅफ्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. पण, या पोस्टमध्ये त्यांनी आणखी एका अभिनेत्रीला टॅग केलं आहे, ती म्हणजे रिंकू राजगुरु.
हेही वाचा : “निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
छाय कदम यांना रिंकूने सुंदर अशी साडी गिफ्ट केल्याने त्यांनी या पोस्टमध्ये तिला टॅग करत तिचे आभार मानले आहेत. “रिंकू थँक्यू गं या सुंदर साडीसाठी” असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. यावरून दोघींमध्ये किती सुंदर बॉण्डिंग आहे याची प्रचिती येते.
‘सैराट’ चित्रपटात केलंय एकत्र काम
रिंकू राजगुरु ( Rinku Rajguru ) आणि छाया कदम यांनी २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. रिंकूचं पात्र आर्ची हे सर्वत्र गाजलं पण, याचबरोबर छाया कदम यांनी साकारलेली सुमन अक्का सुद्धा सर्वांच्या लक्षात राहिली. चित्रपटातील त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने सर्वांचं मन जिंकून घेतलं होतं. यानंतर त्या ‘न्यूड’, ‘रेडू’ यांसारख्या चित्रपटात झळकल्या.