मराठी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट आहेत, ज्यांची भुरळ प्रेक्षकांच्या मनावर कायम राहते. चित्रपटाचे कथानक, कलाकारांचा सहज अभिनय, संगीत अशा अनेकविध गोष्टींमुळे चित्रपटाचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर कायम राहत असल्याचे पाहायला मिळते. अशा चित्रपटांपैकी एक म्हणजे रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा सिनेमा होय. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकल्याचे पाहायला मिळाले होते. या सिनेमामध्ये रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, अशोक सराफ यांच्याबरोबर जिया शंकर ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसली होती. आता एका मुलाखतीत तिने रितेश आणि जिनिलियाबद्दल वक्तव्य केले आहे.

काय म्हणाली जिया शंकर?

अभिनेत्री जिया शंकरने नुकतीच ‘पिंकविला’च्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘वेड’ चित्रपटानंतर तू रितेश देशमुख किंवा जिनिलियाच्या संपर्कात आहेस का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने म्हटले, “ते दोघेही खूप चांगले आहेत. नुकतेच माझ्या आईला दवाखान्यात दाखल केले होते. माझा प्रार्थनांवर विश्वास आहे. मला वाटते जर उपचारांचा काही फायदा नाही झाला तरी प्रार्थना उपयोगी येतील. त्यामुळे मी फक्त एक ट्विट केले होते. कारण मला ओळखणारे, माझ्या आईला ओळखणारे, तिच्यावर प्रेम करणारे लोक आहेत. तर त्यांनी तिच्यासाठी प्रार्थना करावी असे मला वाटत होते. कारण मी त्यावेळी खूप डिस्टर्ब होते, तर ते ट्विट व्हायरल झाले. खूप लोकांनी मला मेसेज केले, माझ्या आईसाठी प्रार्थना कऱणारे ट्विट केले.”

पुढे बोलताना अभिनेत्री म्हणते, “जेव्हा जिनिलियापर्यंत हे ट्विट पोहचले तेव्हा तिने मला फोन केला. त्यावेळी मी रितेश सरांबरोबरदेखील बोलले. “कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर आम्हाला कळव”, असे त्यांनी मला सांगितले. जिनिलिया आणि रितेश दोघेही माणूस म्हणून खूप चांगले आहेत. जर तुम्हाला त्यांना जाणून घ्यायची संधी मिळाली तर तुम्ही भाग्यवान आहात”, असे म्हणत जियाने या जोडीचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे लता मंगेशकर यांचे गाणे ऐकल्यावर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झालेले भावूक; आठवण सांगत म्हणालेल्या….

जिया शंकरच्या कामाबद्दल बोलायचे तर तिने हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. २०२२ मध्ये ‘वेड’ चित्रपटात दमदार अभिनय करत तिने प्रेक्षकांचे मन जिंकले होते.

दरम्यान, रितेश देशमुखने ‘वेड’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता, तर जिनिलियाने या सिनेमाची निर्मिती केली होती. सध्या रितेश देशमुख बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहे, त्यामुळे तो सातत्याने चर्चेत असतो. याबरोबरच रितेश आणि जिनिलिया त्यांच्या सोशल मीडियावरील रील्समुळेदेखील चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.