“देख अंजू अगर तू नही चलेगी तो मैं तुमसे कभी बात नहीं करूंगा” नोव्हेंबर २००२ पासून सुरू झालेला हा ‘रील’ आयुष्यातील प्रवास कधी ‘रिअल’ आयुष्यात रुपांतरित झाला हे त्या दोघांनाही समजलं नाही अन् बघता बघता दक्षिणेत रुळलेली डिसुझांची लेक देशमुखांची धाकटी सून झाली. अशी ही मनोरंजनविश्वासह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे जिनिलीया आणि रितेश देशमुख.
रितेश-जिनिलीयाकडे बॉलीवूडमध्ये आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं, तर महाराष्ट्रात हे दोघेही लातूरचे लाडके दादा-वहिनी म्हणून ओळखले जातात. याचं कारण म्हणजे, त्यांचे चाहते या दोघांकडे ‘कपल गोल्स’ म्हणून पाहतात. तब्बल १० वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी ३ फेब्रुवारी २०१२ रोजी थाटामाटात लग्न केलं. आज यांच्या सुखी वैवाहिक आयुष्याला तब्बल १२ वर्षे पूर्ण झालेली आहेत. यानिमित्ताने आपण रितेश-जिनिलीयाची अनोखी प्रेमकहाणी व लग्नापूर्वीचा हटके किस्सा जाणून घेऊयात…
हेही वाचा : श्रेयस तळपदे : एकेकाळी पैशांची अडचण ते आज कोट्यवधींचा मालक, पडद्यामागच्या ‘पुष्पा’चा ‘असा’ आहे प्रवास
गोष्ट आहे २००२ ची… रितेश देशमुखने आर्किटेक्चर म्हणून पदवी मिळवली व पुढे तो कामानिमित्त न्यूयॉर्कला गेला. अशातच एके दिवशी रितेशला एका चित्रपटाची ऑफर देण्यात आली. आयुष्यात एकदा वेगळा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? असा विचार करून रितेशने चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी वडील विलासराव देशमुख यांची परवानगी घेतली. घरून होकार आल्यावर रितेशने आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली अन् हैदराबाद एअरपोर्टवर हिरोच्या जीवनात एका हिरोइनची एन्ट्री झाली.
२००२ मध्ये विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे “रितेश हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे तो नीट संवाद साधणार नाही, त्याला गर्व असेल” असा गोड गैरसमज जिनिलीयाने करून घेतला होता. जेव्हा हैदराबाद विमानतळावर दोघांची पहिली भेट झाली तेव्हा, जिनिलीयाने रितेशला व्यवस्थित ‘हाय-हॅलो’ देखील केलं नव्हतं. पुढे, दोन दिवसांनी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. त्यावेळी अचानक जिनिलीयाने “काय रे तुझे बॉडीगार्ड्स कुठे आहेत, झाडामागे लपले आहेत का?” असा प्रश्न अभिनेत्याला विचारला. यावर रितेशने तिला “मला बॉडीगार्ड्स नाहीत मी एकटाच आलो आहे” असं उत्तर दिलं होतं. यामुळे जिनिलीयाचा गैरसमज दूर झाला अन् दोघांमध्ये मैत्री झाली. वडील मुख्यमंत्री असताना रितेशने कधीच सुरक्षा रक्षकांचा वापर केला नाही तो नेहमीच एकटा फिरायचा. असं अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
रितेश-जिनिलीयामध्ये मैत्री झाल्यावर पुढे अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी या नात्याला सुरुवात केली. २००२ ते २०१२ ही १० वर्षे हे दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये या जोडप्याने दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने थाटामाटात लग्न केलं होतं. रितेश याबद्दल सांगतो, “आमचं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप होतं. तेव्हा संपूर्ण मीडिया वांद्रे येथे असायची. त्यामुळे आम्ही दोघं गुपचूप दक्षिण मुंबईत भेटायचो. या १० वर्षांच्या काळात आम्हाला अनेकदा “तुम्ही दोघं डेट करताय का? तुम्ही एकत्र आहात का?” असे प्रश्न पापाराजींकडून विचारण्यात आले. तेव्हा मी सर्वांना ‘We are just Good Friends’ असं उत्तर द्यायचो. आमचं लग्न झाल्यावर जेव्हा आम्ही पहिल्यांदा मीडियासमोर गेलो तेव्हा मी त्यांना ‘We are still Good Friends’ असं सांगितलं होतं.”
दहा वर्षे एकमेकांबरोबर असताना जिनिलीया अनेकदा देशमुखांकडे गेली होती. याबद्दल अभिनेत्री सांगते, “रितेशच्या आईमुळे मला उत्तम मराठी येऊ लागलं. मी लग्नाआधी त्यांना रितेशची मैत्रीण म्हणून भेटायला गेले होते. मला सुरुवातीला वाटलं, मुख्यमंत्र्यांचं घर असेल…आपण कसं वागायचं, कसं बोलायचं? पण, असं काहीच नव्हतं. सर्वसामान्य लोकांप्रमाणे हे सगळे घरात वावरत होते. मला आईंनी पोहे खाणार का? तुझ्यासाठी दुसरं काही बनवू का? एवढी विचारपूस केली होती. मी आणि रितेशची आई त्यादिवशी त्यांच्या घरातील श्वानांबरोबर खेळलो. एवढं सुंदर वातावरण त्यांच्या घरी होतं.”
रितेशला फोटोग्राफीचं प्रचंड वेड होतं. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत रितेशने त्याच्या फोटोग्राफीच्या आवडीबद्दल सांगितलं होतं. त्याला फोटोग्राफीचा अफाट छंद होता. मात्र चित्रपटात पदार्पण केल्यानंतर त्याला आपल्या प्रेमाचा विसर पडला होता. जिनिलीयानेच त्याला पुन्हा फोटोग्राफी करण्याचा सल्ला दिला. फक्त सल्ला देऊन न थांबता तिने त्याला कॅमेरा देखील भेट दिला होता.
२००२ ते २०१२ या संपूर्ण काळात रितेश-जिनिलीयाने एकमेकांना प्रपोज केलं नव्हतं. त्यामुळे लग्नाला ३ दिवस बाकी राहिले असताना रितेशने अभिनेत्रीसाठी ड्रीम प्रपोजल प्लॅन केलं होतं. लग्नाच्या आधीचे काही दिवस दोघांसाठी प्रचंड धावपळीचे होते कारण, त्याच दरम्यान फिल्मफेअरचं शूटिंग सुरू होतं. अशात वेळात वेळ काढून रितेशने जिनीला गेटवे ऑफ इंडियाजवळ नेलं. तिथून दोघेही याचवर बसले व मरीन ड्राइव्ह परिसरात फेरफटका मारण्यासाठी निघाले. यावेळी सूर्यास्ताची वेळ होती. अभिनेत्याने बोटीवरच होणाऱ्या बायकोच्या आवडीचा पिझ्झा ऑर्डर करून ठेवला होता. या जोडप्याची बोट मरीन ड्राइव्हजवळ आल्यावर रितेशने ठरवल्याप्रमाणे जवळपास राहणाऱ्या एका मित्राला ‘ओके’ असा मेसेज केला. त्यानंतर त्या मित्राच्या घराच्या टेरेसवर पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यात Will You Marry असा संदेश लिहिण्यात आला होता. अशाप्रकारे रितेशने लग्नाच्या फक्त ३ दिवस आधी जिनिलीयाला फिल्मी स्टाइलने प्रपोज केलं होतं.
प्रेमाने ‘या’ नावाने मारतात हाक
जिनिलीयाने काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात घरी हे दोघे एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारतात याबद्दल खुलासा केला होता. “रितेश मला फार पूर्वीपासून ‘जीन्स’ या नावाने हाक मारायचा. हे नाव ऐकून माझ्या सासूबाई सुरुवातीला गोंधळून गेल्या होत्या. त्यांना वाटायचे हा जिनिलीयाला ‘जीन्स’ का बोलत असेल. त्यांना कदाचित कपड्याची जीन्स वाटत असेल… एकंदर ‘जीन्स’ या नावामुळे सुरुवातीला आमच्या घरी सगळा गोंधळ निर्माण झाला होता. याउलट मी रितेशला प्रेमाने ‘ढोलू’ म्हणते. मला खरंच आठवत नाही, या नावाने मी त्याला केव्हापासून हाक मारू लागले. पण, आता खूप वर्ष झाली मी रितेशला याच नावाने हात मारतेय.”
देशमुखांची सून झाल्यावर जिनिलीयाच्या सासरच्यांनी सुनेवर मुलीसारखी माया केली. याच मायेमुळे कौटुंबिक जबाबदारी पार पाडल्यावर आणि रियान व राहील झाल्यावर अभिनेत्रीने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं. ‘वेड’ चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं. तर जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने पडद्यावर तब्बल दहा वर्षांनी कमबॅक केलं. रितेशबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर जिनिलीयाने करिअरमधून ब्रेक घेतला होता. दोन मुलांचं संगोपन केल्यावर जिनिलीयाने पुन्हा ‘वेड’ चित्रपटाच्या निमित्ताने तिच्या नव्या इनिंगला सुरुवात केली. सध्या हे जोडपं त्यांच्या लग्नाचा १२ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरगुती ट्रिपला गेलं आहे. अशा या गोड, आदर्श जोडीला सुखी वैवाहिक आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा!