अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचा वेड हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामुळे ते दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर, गाणी प्रदर्शित झाली आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये रितेश व जिनिलीयाची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक थक्क झाले. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते दोघेही कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी रितेश देशमुखच्या मीडिया आयोजकांकडून पत्रकारांना हीन दर्जाची वागणूक देण्यात आली, असा आरोप केला जात आहे. त्यावर रितेश देशमुखने स्पष्टीकरण दिले आहे.
रितेश देशमुख हा कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनाला आणि वेड चित्रपटाच्या प्रमोशनला गेला होता. यावेळी दुपारी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रितेशने पत्रकार संघटनेचा अवमान केला, अशी तक्रार एका पत्रकाराने केली होती. याबद्दल प्रतिक्रिया देताना रितेशने सर्व पत्रकारांची माफी मागितली आहे. तुमचा अवमान झाला, त्याबद्दल मला माफ करा, असं रितेश म्हणाला.
रितेश देशमुख काय म्हणाला?
“तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्याकडून काही अवमान वगैरे झाला तर मी तुमची माफी मागतो. आम्ही कोणाला भेटणार याचे आयोजन आम्ही केले नव्हते. तुमच्याबरोबर काय घडलं याबद्दल मला माहिती नाही. मी इथे आलो, पण कोणाला भेटायचं आहे, हेही मला ठाऊक नव्हतं, ते माझ्या हातात नव्हतं. पण तुमचा अवमान झाला असेल तर त्याबद्दल मी खरंच तुमची माफी मागतो. तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या.
आम्ही एकत्र कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनाला कधीही एकत्र आलो नव्हतो. मी इथे चित्रपटासाठी किंवा प्रमोशनसाठी आलो नव्हतो. माझ्या लग्नाला अकरा वर्ष झाली. काही लोकांशी समक्ष भेट झाली नाही. त्याबद्दल मी माफी मागतो आणि कोणाचा अवमान झाला असेल तर त्यांचीही मी माफी मागतो. तुम्हा सर्वांवर महालक्ष्मीचा आशीर्वाद असावा, अशी माझी मनोकामना”, असे रितेशने यावेळी म्हटले.
नेमकं प्रकरण काय?
रितेश देशमुख यांच्या मीडिया ऑर्गनायझरकडून कोल्हापुरात पत्रकारांना हीन दर्जाची वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनानंतर रितेश जिनिलीया माध्यमांशी बोलत असताना काही पत्रकारांनी त्याच्याकडे नाराजी व्यक्त केली. एका पत्रकाराने नाराजी व्यक्त करत म्हटलं की, ‘आम्हाला निमंत्रण नव्हतं हे मान्य, पण आम्हाला कल्पना नव्हती की निवडक लोक आहेत की सगळ्यांना बोलू दिलं जाणार, पण आमच्या पाठी बाऊन्सर लावून हॉटेलमधून हाकललं. आमचा अवमान झालाय. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहचवणं गरजेचं होतं, असे त्या पत्रकाराने म्हटले.
दरम्यान ‘वेड’ या मराठी चित्रपटातून रितेश देशमुख हा दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या चित्रपटात त्याची पत्नी जिनिलीया दिसणार आहे. तर दुसरीकडे येत्या २०२३ ला सलमान खान हा दोन मोठ्या चित्रपटात दिसणार आहे. सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ईद दिवशी प्रदर्शित होणार आहे. तर ‘टायगर 3’ हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.