Riteish Deshmukh Birthday : “माझ्या नावाची मी काळजी घेतो, तुझ्या नावाची तू काळजी घे” वडिलांनी दिलेल्या या एका सल्ल्यामुळे रितेश देशमुखचं संपूर्ण आयुष्य बदललं अन् बघता बघता राजकीय कुटुंबात जन्मलेल्या मराठी मुलाला बॉलीवूडचं ‘वेड’ लागलं. ‘तुझे मेरी कसम’ म्हणत रितेशने सिनेविश्वात पदार्पण केलं आणि आज गेली २० वर्ष तो प्रेक्षकांचं ‘लय भारी’ मनोरंजन करत आहे. रितेशने अभिनय क्षेत्रात यश मिळवलंच पण, त्या पलीकडे एक माणूस म्हणून तो प्रेक्षकांना सर्वात जास्त भावला. डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो, तर राजकारण्यांची मुलं राजकीय क्षेत्रात येतात याला अपवाद ठरला रितेश विलासराव देशमुख! दमदार अभिनय अन् स्वत:च्या गोड स्वभावाने सर्वांना आपलंसं करून घेणाऱ्या लातूरच्या या रांगड्या हिरोचा आज ४५ वा वाढदिवस! या निमित्ताने त्याचा प्रवास जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश देशमुखचा जन्म १७ डिसेंबर १९७८ रोजी लातूर येथे झाला. महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा तो द्वितीय चिरंजीव. रितेशला अमित व धिरज असे दोन भाऊ आहेत. त्याचे दोन्ही भाऊ अभ्यासात प्रचंड हुशार होते. मोठ्या भावाचा अभियांत्रिकी पदवीचा अभ्यास पाहून रितेशने आर्किटेक्चर बनयाचं ठरवलं. यानुसार, त्याने मुंबईतील ‘रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’मध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने एका परदेशातील एका नामांकित कंपनीत जवळपास एक वर्ष आर्किटेक्ट म्हणून काम केलं. परंतु, याच दरम्यान रितेशला चित्रपटासाठी विचारणा झाली अन् तो अभिनय क्षेत्राकडे वळला.

चित्रपटाबद्दल रितेशने सर्वात आधी त्याच्या आईला सांगितलं होतं. यानंतर त्याने कलाविश्वातील पदार्पणासंदर्भात वडिलांशी चर्चा केली. चित्रपट फ्लॉप झाला किंवा आपला अभिनय आवडला नाही, तर लोक आपल्या मुख्यमंत्री वडिलांना नावं ठेवतील याची भिती सतत त्याच्या मनात होती. लेकाचं म्हणणं ऐकल्यावर विलासरावांनी “माझ्या नावाची मी काळजी घेतो, तुझ्या नावाची तू काळजी घे” हा बहुमोलाचा सल्ला त्याला दिला होता. हा सल्ला माझ्या सदैव लक्षात राहील असं अभिनेत्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. याशिवाय त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर अवार्डचं नॉमिनेशन मिळालं होतं.

हेही वाचा : Video : “प्रिया लग्नाचा वाढदिवस विसरली अन्…”, उमेश कामतचा बायकोबद्दलचा खुलासा ऐकून भर कार्यक्रमात पिकला एकच हशा!

बॉलीवूड गाजवणारा मराठी अभिनेता

रितेश देशमुखने आपल्या अभिनयाची सुरूवात २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटापासून केली. या रोमँटिक चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा प्रेमाचे वारे वाहू लागले होते. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटामुळे रितेश-जिनिलीयाची पहिली भेट झाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन विजया भास्कर यांनी केलं होतं. यानंतर त्याने ‘मस्ती’, ‘ग्रँड मस्ती’, ‘टोटल धमाल’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘क्या कूल है हम’, ‘ब्लफमास्टर’, ‘हे बेबी’, ‘धमाल’, ‘डबल धमाल’, ‘मालामाल’, ‘हाऊसफुल’, ‘मरजावा’, ‘बागी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. बॉलीवूडमध्ये सलग बरीच वर्ष रितेशने विनोदी भूमिका साकारल्या होत्या.

रितेशने ‘विनोदी कलाकार’ या टॅगला खऱ्या अर्थाने छेद दिला तो ‘एक व्हिलन’ या चित्रपटाने. यामध्ये त्याने साकारलेल्या ‘व्हिलन’मुळे प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाची दुसरी बाजू पाहायला मिळाली. त्याने साकारलेल्या सीरियल किलरच्या भूमिकेचं अनेक चित्रपट समीक्षकांनी देखील कौतुक केलं. आता अभिनय क्षेत्र सांभाळून रितेश स्वत:ची आर्किटेक्चरल डिझायनिंग कंपनी चालवतो. याशिवाय त्याने स्वत:ची प्रोडक्शन कंपनीही सुरू केली आहे.

मराठी कलाविश्वात घेतली ‘लय भारी’ एन्ट्री

रितेशने २०१३ मध्ये ‘बालक पालक’ या चित्रपटाची निर्मिती केली. नवनवीन विषय मोठ्या पडद्यावर मांडण्यास एक निर्माता म्हणून त्याने नेहमीच प्राधान्य दिलं अन् याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी आली. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘फास्टर फेणे’देखील रितेशच्या निर्मितीचा एक भाग होता. निर्मिती क्षेत्रात जम बसल्यावर त्याने मराठी मनोरंजनसृष्टीत अभिनेता म्हणून २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लय भारी’ चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटाचे शो १०० दिवसांपेक्षा अधिक काळ संपूर्ण महाराष्ट्रभरात सुरू होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. ‘लय भारी’, ‘माऊली’नंतर गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’मुळे मराठी प्रेक्षकांना सत्या-श्रावणीची अनोखी प्रेमकहाणी अनुभवायला मिळाली. रितेशच्या या पहिल्याच दिग्दर्शित चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला ‘वेड’ लावलं होतं.

देशमुख कुटुंब (फोटो सौजन्य : रितेश देशमुख इन्स्टाग्राम )

मराठी चित्रपटांमध्ये का लावतो पूर्ण नाव?

हिंदी चित्रपटांमध्ये रितेश देशमुख एवढंच नाव पडद्यावर झळकतं. परंतु, मराठी चित्रपटात अभिनेत्याचं ‘रितेश विलासराव देशमुख’ असं पूर्ण नाव पडद्यावर येतं. रितेशने यामागचं कारण ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. “माझा पहिला मराठी चित्रपट ‘लय भारी’ प्रदर्शित झाला, तेव्हा माझे वडील नव्हते. तेव्हा मला त्यांची खूप आठवण येत होती. ते माझ्याबरोबर कसे असतील, हा विचार मी करत होतो. त्यामुळे हिंदी चित्रपटात माझं नाव फक्त रितेश देशमुख एवढंच दिसतं. पण, मराठी चित्रपटात मी ‘रितेश विलासराव देशमुख’ असं पूर्ण नाव लावतो.”

हेही वाचा : ‘अ‍ॅनिमल’मधील बॉबी देओलच्या गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “अविनाश साहेब…”

रितेश – जिनिलीयाची ‘वेड’ लावणारी लव्हस्टोरी

‘तुझे मेरी कसम’च्या सेटवर रितेश-जिनिलीयाची पहिली भेट झाली. सुरूवातीला मुख्यमंत्र्यांचा लेक असल्याने जिनिलीया त्याच्याशी फारशी बोलायची नाही. पण, कालांतराने दोघांमध्ये खूप छान मैत्री झाली अन् पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. जवळपास ८ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने २ फेब्रुवारी २०१२ मध्ये लग्न केलं. जिनिलीया ख्रिश्चन व रितेश हिंदू असल्याने दोन्ही पद्धतीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. याच काळात दोघांचा ‘तेरे नाल लव्ह हो गया’ हा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या दोघांच्या फ्रेश जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात प्रचंड गर्दी केली होती. लग्नानंतर रितेश-जिनिलीया महाराष्ट्राचे दादा-वहिनी म्हणून ओळखले जाऊ लागले. या जोडप्याला आता रियान व राहील अशी दोन मुलं आहेत.

रितेश-जिनिलीयाचा ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटादरम्यानचा फोटो ( फोटो सौजन्य : रितेश देशमुख इन्स्टाग्राम )

‘प्लांट बेस्ड मीट’ कंपनीची सुरुवात

रितेश आणि जिनिलीयाने २०२० मध्ये ‘इमॅजिन मीट्स’ ही प्लांट बेस्ड मीट कंपनी सुरू केली अन् जोडीने नव्या व्यवसायात पदार्पण केलं. कंपनीच्या नावात जरी मीट असलं तरीही हे पदार्थ मांसाहारी नसून शाकाहारी असतात. त्याला केवळ मांसाहारी पदार्थाचं रुप दिलं जातं. वर्षभर या प्रोजेक्टवर काम करून रितेश-जिनिलीयाने ‘इमॅजिन मीट्स’ची सुरूवात केली होती. बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या या नव्या व्यवसायाचं कौतुक केलंय. याबद्दल रितेश सांगतो, “साधारण ४ वर्षांपूर्वी मी शाकाहारी झालो. यानंतर अनेकदा मला मांसाहारी पदार्थांची आठवण यायची. अखेर आता या प्लांट बेस्ड मीटमुळे मला जेवताना समाधान मिळतं.”

हेही वाचा : “माझ्या बॉयला मिळणारे पैसे…”, श्वेता शिंदेने सांगितली मराठी व हिंदीमधील मानधनातील तफावत; ‘तो’ प्रसंग आठवत म्हणाली…

रितेशची मुलं रियान व राहील ( फोटो सौजन्य : रितेश देशमुख इन्स्टाग्राम )

देशमुखांचे संस्कार

रितेश-जिनिलीयाच्या मुलांच्या संस्कारांचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक होत असतं. ते दोघंही पापाराझींसमोर हात जोडत असल्याचं पाहायला मिळतं. “तुझी मुलं कॅमेरा दिसला की हात का जोडतात?” असा प्रश्न विचारल्यावर रितेश म्हणतो, “मी आणि जिनिलीयाने आधीच मुलांना सांगून ठेवलंय की, आमच्या दोघांच्या कामामुळे तुमचे फोटो काढले जातात. यात तुम्ही काहीच केलेलं नाही तुम्हाला आयुष्यात आणखी मोठा टप्पा गाठायचा आहे. त्यामुळे त्या फोटोग्राफरचे तुम्ही हात जोडून आभार मानले पाहिजेत.” रियान व राहील यांची मीडियासमोर वागण्या-बोलण्याची पद्धत आणि देशमुखांचे संस्कार याचं इन्स्टाग्रामवर नेहमी कौतुक होतं असतं. अशा या मराठीसह बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या रितेश देशमुखला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh birthday article father vilasrao deshmukh gave him life changing lesson sva 00