रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले आहेत, तरीही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता, तेव्हापासून आतापर्यंत चित्रपटाने ५५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. खूप दिवसांनी मराठीत इतकी कमाई करणारा चित्रपट आला.
‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम मोडीत काढले आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच जिनिलीया मराठी चित्रपटांमध्ये मराठी महिलेच्या भूमिकेत झळकली. तर, खूप वर्षांनी तिची व रितेश या रिअल लाइफ कपलची केमिस्ट्री चाहत्यांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली. या चित्रपटात अशोक सराफ, जिया शंकर यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
‘वेड’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील अनेक किस्से व्हायरल होत आहेत. त्यातलाच एक किस्सा चित्रपटातील बालकलाकार खुशी हजारेबदद्लचा आहे. चित्रपटात खुशीने साकारलेल्या पात्राचं नाव आधी वेगळं ठेवण्यात आलं होतं, पण तिच्या अभिनयाने प्रभावित झालेल्या रितेशने तिचं खरं नाव पात्राला देण्याचा निर्णय घेतला.
सत्या आणि श्रावणीचं आयुष्य खुशीमुळे बदलून जातं, असं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ‘वेड’ चित्रपटात खुशीच्या पात्राचे नाव आधी मीरा होते. मात्र तिचा अभिनय पाहून रितेशने तिचं खरं नाव खुशी पात्राला दिलं. खुशीने शुटींगच्या पहिल्याच दिवशी रितेशचे मन जिंकलं होतं. शूटिंग सुरू असताना रितेश खुशीला तिचा सीन समजावून सांगत होता. “तू माझ्याकडे रागाने बघ, चालत ये आणि हेल्मेट काढ” असं रितेशने तिला सांगितलं. तिने एकाच टेकमध्ये हा सीन केला. हे पाहून रितेशला तिचं खूप कौतुक वाटलं. त्यामुळे त्याने चित्रपटातील तिचं नाव बदलून खुशी ठेवलं.
दरम्यान, बालकलाकार खुशी हजारे हिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. फक्त मराठीच नव्हे तर तिने बॉलिवूडमध्येही काम केलंय. ‘भूत’, ‘आपडी थापडी’, ‘वजनदार’, ‘प्रवास’, ‘सरबजीत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये खुशीने अभिनय केला आहे. तिने जवळपास १३ चित्रपटांमध्ये काम केलंय.