Raja Shivaji Movie: अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या त्याच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. साताऱ्यात या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली. मंगळवारी ( २२ एप्रिल) रोजी शूटिंग पूर्ण झाल्यानंतर चित्रपटात काम करणारा एक डान्सर नदीत बुडाला. दोन दिवसांनी या डान्सरचा मृतदेह सापडला आहे.
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या कोरिओग्राफी टीमचा भाग असलेल्या २६ वर्षीय डान्सरचा गाण्याचे शूटिंग संपल्यानंतर कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली.
अधिकाऱ्याने दिली मृत डान्सरबद्दल माहिती
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृताचे नाव सौरभ शर्मा असे असून त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी सापडला. सौरभ दोन दिवसांपासून बेपत्ता होता. सातारा जिल्ह्यातील संगम माहुली गावात मंगळवारी संध्याकाळी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना ही घटना घडली होती.
अधिकाऱ्याने सांगितलं की, गाण्याचे शूटिंग संपल्यानंतर सौरभ कृष्णा नदीत हात धुण्यासाठी गेला होता. हात धुऊन झाल्यावर तो पोहण्यासाठी पाण्यात गेला पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला. सौरभ बेपत्ता झाल्याचं समजताच अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख, निर्मात्या जिनिलीया देशमुख आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा हे संपूर्ण टीमसह तात्काळ नदीकाठी पोहोचले. त्यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला सौरभ बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि शोध मोहीम सुरू केली.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री अंधार झाल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली. बुधवारी पुन्हा सौरभला शोधण्यात आलं. दिवसभर शोधूनही तो सापडला नाही. त्यानंतर गुरुवारी सकाळी साडेसात वाजता पोलीस व बचाव पथकाला सौरभचा मृतदेह नदीतून सापडला. याप्रकरणी सातारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.