Suraj Chavan & Riteish Deshmukh : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाण घराघरांत लोकप्रिय झाला. शो सुरू असताना आपल्या साध्याभोळ्या स्वभावामुळे सूरजने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. यानंतर हळुहळू या गेममध्ये पुढे जात सूरजने शोचं विजेतेपद पटकावलं.
महाअंतिम सोहळ्यात दिग्दर्शक केदार शिंदेंनी सूरजबरोबर लवकरच ‘झापुक झुपूक’ सिनेमा बनवणार अशी घोषणा केली होती. आता लवकरच सूरजची हिरो म्हणून मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने अभिनेत्याने ‘लोकशाही फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत सूरजने रितेश देशमुखने त्याला काय सल्ला दिलाय हे सांगितलं.
सूरज म्हणाला, “आज गावागावांत माझे बॅनर्स लागले आहेत. मला खरंच या गोष्टीचा अभिमान वाटतोय. मी खरंच खूप जास्त खूश आहे. ट्रेलर पण सर्वांना आवडला आहे. माझे फॅन्स ट्रेलरच्या कमेंट्समध्ये जाळं अन् धूर करत आहेत. हे पाहून खरंच छान वाटतं.”
रितेश देशमुखने सूरजला त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला नक्की येईन असा शब्द दिला होता. दिलेल्या शब्दाप्रमाणे तो सूरजला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता. यावेळी त्याच्याशी काय बोलणं झालं, रितेशने सूरजला काय सल्ला दिला याविषयी सांगताना सूरज म्हणतो, “रितेश सर नेहमी सांगतात तू असाच मोठा हो…आम्हाला बरं वाटतंय की, साधा गावातला मुलगा आज एवढा मोठा झालाय. तुला मिळणारं यश पाहून खूप आनंद होतोय…आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलीये, एकप्रकारे त्यांनी मला सल्लाच दिलाय… तो म्हणजे, केदार सरांची साथ कधीही सोडू नकोस.”
माझ्या बहिणी सुद्धा रितेश सरांना भेटून आनंदी झाल्या. मला माहिती नव्हतं सर असे येणार आहे. माझ्या बहिणींना सरांना खूप दिवसांपासून भेटायचं होतं. ट्रेलर पाहून सगळेच भावुक झाले होते. असं सूरजने सांगितलं.
दरम्यान, सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक’ सिनेमा येत्या २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्यासह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव असे अनेक कलाकार आहेत.