रितेश देशमुख आणि जिनिलीया हे दोघेही प्रसिद्ध कलाकार आहेत दोघांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलंय. हे जोडपं सध्या त्यांच्या ‘वेड’ या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. दोघेही पहिल्यांदाच एकत्र मराठी चित्रपट करत आहेत. जिनिलीया या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. चित्रपटाच्या निमित्ताने रितेश आणि जिनिलीया त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से शेअर करताना दिसतात. रितेश-जिनिलीयाला रियान आणि राहील नावाची दोन मुलं आहेत. अलीकडेच आपल्या मुलांनी आपला कोणताच चित्रपट पाहिला नसल्याचा खुलासा रितेशने केला.
रितेश म्हणाला, “माझ्या मुलांना फार उशीरा कळालं की मी चित्रपटात काम करतो. चित्रपट काय असतो, तेही त्यांना खूप उशीरा कळालं. त्यांनी कधीच आमचे चित्रपट पाहिलेले नाहीत. माझ्या मुलांनी आतापर्यंत माझा फक्त एकच चित्रपट पाहिलाय, तोही त्यांनी पूर्ण पाहिलेला नाही. त्यांनी ‘टोटल धमाल’ चित्रपट अर्धा पाहिलाय. मी आणि जिनिलीयाने आतापर्यंत जवळपास ८० चित्रपटांमध्ये काम केलंय. पण त्यांनी त्यातला एकही चित्रपट पाहिलेला नाही,” असं रितेश ‘झी २४ तास’शी बोलताना म्हणाला.
…आणि जिनिलीया देशमुखने मानले सायली संजीवचे हात जोडून आभार, जाणून घ्या नक्की काय झालं
यावेळी रितेशने एक किस्साही सांगितला. “मी घरी होतो आणि मी मुलांना सांगितलं की मी कामावर जातोय. त्यावेळी हाऊसफूल ४चं शूटींग सुरू होतं. त्यातल्या एका गाण्याचं शूट मॅरियट हॉटेलमध्ये सुरू होतं. मी जिनिलीयाला सांगितलं की ‘हॉटेल मॅरियटमध्ये शूटींग सुरू आहे, तू मुलांना घेऊन ये. असंही मुलं कधी बाहेर जात नाहीत. आपण बाहेरच जेवण करू, त्यांनाही बरं वाटेल.’ जिनिलीया आणि मुलं काही वेळाने आली. हॉटेलमध्ये गोंधळ होता. माझी मुलं रियान आणि राहील घाबरली, त्यांना कळलं नाही, काय चाललंय ते. रियानने हळूच पाहिलं, तर तिथे मी आणि अक्षय कुमार नाचत होतो. त्याने मला बाबा म्हणून हाक मारली. मी त्याला भेटलो, त्यावर तो म्हणतो, ‘तुम्ही मला म्हणाला होतात की तुम्ही कामावर जाताय, तुम्ही तर नाचताय इथे’, हा किस्सा सांगताना रितेश आणि जिनिलीया हसू लागले.
पुढे रितेश म्हणाला, “त्यांना शाळेत गेल्यावर कुणी सांगितलं की तुझे वडील खूप फेमस आहेत, त्यावर मुलाने मला घरी आल्यावर विचारलं. मी सांगितलं की होय थोडा फेमस आहे, त्यावर तो विचारतो की बाबा तुम्ही फूटबॉलपटू मेस्सीपेक्षाही फेमस आहात का? त्याची तुलना ऐकून मीच थक्क झालो” असं रितेशने सांगितलं. मुलांनी स्वतःच शिकावं आणि गोष्टी समजून घ्यावा, या मताचे पालक आपण असल्याचं रितेश म्हणाला.