बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलीया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. रितेश आणि जिनिलीयाला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान रितेशने मुलांच्या संगोपनाबद्दल भाष्य केले. तसेच “माझ्या मुलांना चार वर्षे त्यांचे आई-वडील हे कलाकार आहेत, याची माहिती नव्हती”, असा खुलासाही त्याने केला.
रितेश देशमुखने नुकतंच ‘मुंबई तक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने वेड चित्रपट, कौटुंबिक वातावरण, पत्नी जिनिलिया आणि इतर खासगी गोष्टींबद्दलही खुलासा केला. यावेळी त्याला त्याच्या मुलांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने “मी मुलांना सिनेक्षेत्रापासून लांब ठेवलं आहे”, असे म्हटले.
आणखी वाचा : “माझ्या भावांना माझं आतापर्यंतच कोणतंही काम आवडलेलं नाही” रितेश देशमुखचे थेट भाष्य, म्हणाला “मी सिद्धिविनायकाला…”
“माझ्या दोन्हीही मुलांनी वेड हा पहिला चित्रपट आहे जो जवळून पाहिला आहे. या चित्रपटाच्या सेटवर ते आले. त्यांना अभिनेता काय असतं हे तेव्हा कळलं. चार वर्ष त्यांना त्यांचे आई-वडील हे कलाकार आहेत, याची माहिती नव्हती. ‘हाऊसफुल’ हा पहिला चित्रपट होता, ज्या सेटवर मी मुलांना घेऊन गेलो होतो. त्यादिवशीच त्यांनी सकाळी मला विचारलं, बाबा तुम्ही कुठे जाताय? तेव्हा मी त्यांना कामावर जातोय, असे सांगितले. त्यानंतर दुपारी ते दोघेही सेटवर आले. तेव्हा आम्ही ‘बाला बाला’ या गाण्याचे शूटींग करत होतो.
त्यावेळी त्यांनी सेट पाहिला आणि गाण्याचे शूटींगसाठी लाईट्स लावलेल्या होत्या. त्या दोघांनी घाबरुन पाहिलं आणि जोरात ओरडले, “बाबा तुम्ही म्हणालेला की कामाला चाललात. पण तुम्ही तर इथे नाचताय.” त्यांना यातील काहीच माहिती नव्हती. माझी मुलं चित्रपट जास्त पाहत नाही. त्यांनी माझे फक्त ‘टोटल धमाल’ आणि ‘वेड’ असे दोनच चित्रपट पाहिले”, असे रितेश देशमुख म्हणाला.
“मी माझ्या मुलांपासून टीव्ही, आयपॅड या सर्व गोष्टी दूर ठेवल्या. त्याचं कारण म्हणजे आजकालच्या पिढीने मातीत जास्त खेळायला हवं. फुटबॉल, क्रिकेट असे मैदानी खेळ खेळावेत. घराबाहेर जावं. मैंदूला चालना मिळेल, अशा गोष्टी कराव्यात. सध्या आयपीएल सुरु झाल्याने ते दोघेही दंग झाले आहेत. आयपीएलमध्ये १६० खेळाडू आहेत, कोणता खेळाडू, कोणत्या संघात आहे, किती चौकार, किती षटकार, हे त्यांना तोंडपाठ आहे. आयपीएलमध्ये माझी आवडती टीम मुंबई इंडियन्स आहे. माझ्या एका मुलाला गुजरात आणि एकाला लखनऊची टीम आवडते”, असेही त्याने म्हटले.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” प्रार्थना बेहेरेबरोबर अफेअरच्या चर्चांवर वैभव तत्त्ववादीचे वक्तव्य
दरम्यान, रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेल्या ‘वेड’ चित्रपटाने प्रचंड कमाई केली होती. या चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, अशोक सराफ, विद्याधर जोशी अशी तगडी स्टार कास्ट होती.