प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ चित्रपट प्रदर्शित होऊन आता महिना उलटला तरीही त्याची क्रेझ काही अद्याप कमी झालेली दिसत नाही. या चित्रपटातील गाणी तर खूपच गाजली. विशेष म्हणजे चित्रपटातील ‘वेड लावलंय’ या गाण्याने तर सोशल मीडियावर एक ट्रेंडच सुरू केला आहे. अनेकांनी या गाण्यावर रील्स तयार करून शेअर केले आहेत. अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या लेकींनीही या गाण्यावर चक्क कारमध्ये बसून डान्स केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होताना दिसतोय आणि यावर अभिनेता रितेश देशमुखनेही प्रतिक्रिया दिली आहे.
सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थसह त्याच्या दोन्ही मुली ‘वेड लावलंय’ची सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना सिद्धार्थने, “या दोघींनी मला वेड लावलंय” असं मजेदार कॅप्शन दिलं आहे. सोबतच या पोस्टमध्ये त्याने रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनाही टॅग केलं आहे. सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडलेला दिसत असून त्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच आता रितेश देशमुखनेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा- राखी सावंतच्या वैवाहिक आयुष्यात वादळ; आदिलची गर्लफ्रेंड तनु नेमकी आहे तरी कोण?
रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सिद्धार्थ जाधव आणि त्याच्या मुलींचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत रितेशने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्हाला खूप सारं प्रेम” असं हा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये रितेशने लिहिलं आहे. सिद्धार्थचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
दरम्यान रितेश देशमुखचं दिग्दर्शन आणि जिनिलीया देशमुखची निर्मिती असलेल्या ‘वेड’ या मराठी चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रात ७० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता आणि यातील तिच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.