Zapuk Zupuk Trailer : बारामती जवळच्या मोढवे गावातील रीलस्टार सूरज चव्हाण लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरजवर केदार शिंदेंनी चित्रपट तयार केला असून तो २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट आणणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली होती. त्यामुळे सूरज विजेता ठरल्याने शिंदे त्याच्यावर चित्रपट आणतायत का? अशी चर्चा सुरू होती. याबाबत रितेश देशमुखने वक्तव्य केलं आहे.
७० दिवसांच्या प्रवासानंतर सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी’ हा रिअॅलिटी शो जिंकला. या शोमध्ये वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर असे बरेच सेलिब्रिटी होते. या सर्वांना मागे टाकत सूरजने विजेतपद पटकावलं होतं. कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड व दिग्दर्शक केदार शिंदे यांनी शोच्या ग्रँड फिनालेमध्ये ‘झापूक झुपूक’ नावाचा सिनेमा सूरज चव्हाणला घेऊन करणार, असं म्हटलं होतं. त्यांनी दिलेला शब्द पाळला असून शो संपल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला ‘बिग बॉस मराठी’चा होस्ट रितेश देशमुख उपस्थित होता. रितेश सूरज व या सिनेमाबद्दल काय म्हणाला, ते जाणून घेऊयात.
मला सूरजचा खूप अभिमान आहे – रितेश देशमुख
ट्रेलर लाँच कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुखने ‘झापुक झुपूक’च्या प्रवासाबद्दल सांगितलं. “बिग बॉसची सुरुवात झाली तेव्हा माझा आणि सूरजचा तो पहिला प्रवास होता. केदार भाऊंसाठी सुद्धा तो पहिला प्रवास होता. सूरज जेव्हा बॉग बॉसच्या घरात तिसऱ्या आठवड्यात होता तेव्हाच केदार भाऊंनी सूरजवर सिनेमा बनवण्याचं ठरवलं होतं. त्यांनी त्यावेळी मला म्हंटलं होतं की ‘विजेता कोणीही असू दे, मी सूरजवर चित्रपट बनवणार’ आणि या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. सूरज जिंकल्यामुळे सिनेमा बनवण्यात आलाय, असं नाही. केदार भाऊंची हिम्मत आणि कंमिटमेंटला माझा सलाम आहे. या सिनेमाचं संगीत, एडिटिंग, स्टोरी सगळंच अप्रतिम आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर आहे. सूरज आणि संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. महाराष्ट्रतील प्रेक्षक आणि सूरजचे चाहते नक्कीच सिनेमागृहात जाणार आहे यात मला काहीच शंका नाही. मला सूरजचा खूप अभिमान आहे,” असं रितेश देशमुख म्हणाला.
केदार शिंदे काय म्हणाले?
“सूरजला घेऊन बिग बॉस मराठी सुरू असताना मला ‘झापुक झुपूक’ची कल्पना सुचली. मी कलर्स मराठीचा प्रोग्रामिंग हेड असल्या कारणामुळे बिग बॉसची जबाबदारी माझ्यावर होती. त्यावेळी माझं आणि रितेशचं खूप बोलणं सुरु असायचं तेव्हाच मी ती कल्पना त्यांना सांगितली. रितेश भाऊंना ही कल्पना भयंकर आवडली आणि त्यांनी सुद्धा मला सांगितलं की जर माझ्याकडे उत्तम गोष्ट आहे तर मी ती पुढे आणावी. आज या ट्रेलरच्या माध्यमातून मी एक सुंदर गोष्ट प्रेक्षकांसमोर आणतोय आणि ह्या वेळेस सुद्धा रितेश भाऊ माझ्या सोबत उभे आहेत याचा मला आनंद आहे,” असं दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले.
झापुक झुपूक’ चित्रपटात सूरजसह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहेत.