Riteish Deshmukh reacts on Badlapur Sexual Assault Case: बदलापूर येथील एका शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. या घटनेनंतर बदलापूरमधील नागरिक संतापले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप नागरिकांनी केला. मंगळवारी असंख्य नागरिक या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले. त्यांनी शाळेची तोडफोड करत आंदोलन केलं. या घटनेवर अनेक मराठी कलाकार संताप व्यक्त करत आहेत. अभिनेता रितेश देशमुखनेही या प्रकरणावर पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूरमधील मुलींवर अत्याचाराचं प्रकरण समोर आल्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रितेशने एक पालक म्हणून या घटनेची प्रचंड चीड येतेय असं म्हटलं आहे. त्याने एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात दोषींना शिक्षा देण्यासाठी जे कायदे वापरले, तेच कायदे पुन्हा आणायची गरज आहे, असं रितेशने म्हटलं आहे.

“माणूस म्हणून नक्की कुठे जातोय आपण?” बदलापूर अत्याचार प्रकरणावर भडकली मृण्मयी; अक्षय केळकर म्हणाला, “कुठल्या तोंडाने…”

रितेश देखमुखची पोस्ट

“एक पालक म्हणून मला खूप चीड येतेय, मला वाईट देखील वाटतंय आणि रागही अनावर होतोय. चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वतःच्या घरांइतकीच सुरक्षित जागा असायला हवी. या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात दोषींना शिक्षा देण्यासाठी जी ‘चौरंग’ शिक्षा वापरली, तीच शिक्षा आता पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे,” अशी पोस्ट रितेशने केली आहे. त्याने बदलापूर क्राइम असा हॅशटॅग या पोस्टला दिला आहे.

रितेश देशमुखची पोस्ट (फोटो – स्क्रीनशॉट)

अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

या दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याची २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या घटनेबद्दल राजकीय नेतेही संताप व्यक्त करत आहेत.

“हाल हाल करून मारा”, बदलापूरमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “काहीतरी भीषण…”

दरम्यान, या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची व सखी सावित्री समिती नसल्याची बाबही उघडकीस आली आहे. “मी शाळेला भेट दिली, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नाहीत. तसंच सखी सावित्री समितीही नाही. पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांना महिला प्रसाधनगृहात जाऊ दिलं जातं आहे. जो आरोपी आहे तो काँट्रॅक्टवर होता. मात्र त्याची पार्श्वभूमी काय हे कुणीही जाणून घेतलं नाही,” अशी प्रतिक्रिया या घटनेवर महाराष्ट्र राज्य बालहक्क समितीच्या अध्यक्षा सुशीबेन शाह दिली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh reacts on badlapur sexual assault case hrc