रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख सध्या त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाने खरोखरच प्रेक्षकांना वेड लावलं आहे. ३० डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. तितकाच चांगला प्रतिसाद प्रेक्षक या चित्रपटाला चित्रपटगृहात देत आहेत. या चित्रपटाबद्दल रितेश आणि जिनिलीया यांचं सगळेजण तोंड भरून कौतुक करत आहेत. आता अशातच हा चित्रपट रितेशने दिग्दर्शित केला नसता असा खुलासा त्याने स्वतः केला आहे.
या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं या त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हिने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी अनेक मुलाखती दिल्या. त्यापैकी एका मुलाखतीत रितेशच्या मनात या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी वेगळ्या दिग्दर्शकाचं नाव होतं असं तो म्हणाला.
‘लेट्स अप मराठी’ला मुलाखत देताना निशिकांत कामत यांचा विषय निघाला. निशिकांत कामत आणि रितेश देशमुख हे खास मित्र होते. निशिकांत कामत यांनी रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं होतं. दोन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. पण आज जर ते असते तर ‘वेड’ हा चित्रपट निशिकांतनेच दिग्दर्शित केला असता असा रितेशने खुलासा केला.
निशिकांत कामत यांच्या आठवणीत भावूक होत रितेश म्हणाला, “‘वेड’ हा चित्रपट मी दिग्दर्शित करतोय कारण निशिकांत कामत आज आपल्यात नाहीये. नाहीतर आज माझी आणि जिनिलीयाची प्रमुख भूमिका असलेला ‘वेड’ हा चित्रपट निशिकांत कामत दिग्दर्शित असता. तो आपल्या सर्वांचा मित्र आहे आणि तो कायमच आपल्या सगळ्यांबरोबर असेल.”
हेही वाचा : “घरात राजकारणाची पार्श्वभूमी असूनही मी मनोरंजन सृष्टीत आलो तेव्हा आई-वडिलांनी…” रितेश देशमुखने केला खुलासा
दरम्यान रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ या चित्रपटाला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाऊसफुल होताना दिसत आहेत. प्रदर्शनाच्या तीन दिवसांतच दिवशी या चित्रपटाने एकूण १० कोटींचा गल्ला जमावला. या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. तर अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.