रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हे त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. रितेश जिनिलीया यांचं सर्वांना आदर देऊन नम्रपणे वागणं, सर्वांशी आपुलकीने बोलणं याचं अनेकदा कौतुक केलं जातं. रितेश प्रत्येक व्यक्तीला ‘तुम्ही’, ‘तुम्हाला’ असे शब्द वापरत कायम आदर देत असतो. त्याच्या मुलांचाही तो कधीच एकेरी उल्लेख करत नाही. पण फक्त त्याच्या आईलाच तो ‘ए आई’ असं म्हणतो. याचं मागचं कारण त्याने सांगितलं.

‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत त्याला “जिनिलीयाला तू नेहमी ‘तुम्ही’ म्हणून संबोधतोस. तुम्हा दोघांच्या विचारांमध्ये, संस्कारांमध्ये खूप साम्य दिसून येतं, असं मुलाखतकार म्हणाली. त्यावर उत्तर देत रितेश म्हणाला, “आमच्या घरी मी फक्त माझ्या आईलाच एकेरी हाक मारतो. मी माझ्या मुलांना ‘तुम्ही’ म्हणतो, माझे आजोबा मला ‘तुम्ही’ म्हणायचे, माझे काका मला ‘तुम्ही’ म्हणतात, माझ्या लहान बहिणीच्या मुलांनाही मी ‘तुम्ही’च म्हणतो. प्रत्येकाला आहो जाहो म्हणण्याची परंपरा ही आमच्या घरातली आहे. प्रत्येक घरातली बोलण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. काहीजण प्रत्येकाला एकेरी हाक मारून त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम दाखवतात; हेही चांगलंच आहे.”

आणखी वाचा : “… तर आज ‘वेड’ माझ्याऐवजी ‘त्याने’ दिग्दर्शित केला असता,” रितेश देशमुखचा चित्रपटाबाबत मोठा खुलासा

हेही वाचा : रितेश-जिनिलीयाचं ‘वेड’ प्रेक्षकांना भावलं, वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘इतके’ कोटी कमावत चित्रपटाची कौतुकास्पद कामगिरी

पुढे तो म्हणाला, “एकदा मला एका अमराठी व्यक्तीने विचारलं होतं की, “तुम्ही प्रत्येकाचा आदरार्थी उल्लेख करता पण तुमच्या आईला मात्र तुम्ही ‘ए आई’ म्हणता, असं का?” त्यावर मी म्हणालो होतो, “तुम्ही बोलताना नेहमी शंकरजी, शिवजी, रामजी, गणेशजी असं म्हणता. पण आम्ही राम, शंकर, गणपती असं म्हणतो. देवाची आणि आईची जागा ही एकच आहे. त्यामुळे देवालाही ‘तू’ आणि आईलाही ‘तू’ असं माझं मत आहे.” रितेशच्या या उत्तराने सर्वांचीच मनं जिंकली.

Story img Loader