अभिनेता रितेश देशमुखचा ‘वेड’ चित्रपट सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही रितेशनं केलं आहे आणि या चित्रपटात रितेश जिनिलीयाची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. ‘वेड’ चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी लोकसत्ताच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीत या दोघांनी दिलखुलास गप्पा मारल्या आणि सर्व प्रश्नाची उत्तरं तर दिलीच पण याबरोबरच काही धम्माल किस्सेही शेअर केले.
रितेश देशमुख आणि जिनिलीयाने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून एकत्रच बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या दोघांच्या पदार्पणाचा तो चित्रपट त्यावेळी चांगलाच गाजला. या चित्रपटाच्या सेटवर या दोघांच्या खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती. पण जेव्हा ते पहिल्यांदा भेटले तेव्हा एकमेकांना अॅटीट्यूड दिला होता. पण त्याआधी विमानात मात्र रितेशबरोबर एक भन्नाट किस्सा घडला होता आणि त्याची फजिती झाली होती.
आणखी वाचा- जिनिलीयाने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मोठ्याने हाक मारली अन्…
विमान घडलेला किस्सा सांगताना रितेश म्हणाला, “मी चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात होतो. मी विमानात बसलो आणि मला सांगण्यात आलं होतं की हैदराबादला जायचंय आणि तुमच्याबरोबर विमानात हिरोईनही असणार आहे. पण माझ्या अनोळखी. मी बसलो होतो एकटा आणि समोर एक मुलगी बसली होती. मी तिच्याकडे पाहिलं सुंदर दिसत होती. नंतर विमानातून उतरताना ती तिची बॅग घेऊन खाली उतरली आणि मी माझी बॅग घेऊन उतरलो.”
रितेश पुढे म्हणाला, “मी विमानातून उतरलो आणि तिथे प्रॉडक्शनवाले आले होते आम्हाला न्यायला. ते म्हणाले, या हिरोईनच्या आई आहेत. तर मी त्यांना नमस्कार केला. त्या म्हणाल्या हॅलो ही माझी मुलगी. मग मी तिला हाय केलं आणि तिच्याकडे पाहिलं. मग म्हटलं अरे आपण विमानात बघितली ती मुलगी तर वेगळीच होती. मी त्या मुलीला पाहिलेलं तेव्हा मला वाटलं होतं की ती हिरोईन असावी. पण माझी फजिती झाली.”
आणखी वाचा- “त्याचं दिग्दर्शन…”; ‘वेड’ चित्रपट पाहून सचिन पिळगावकरांनी केलं रितेश देशमुखचं कौतुक
रितेश व जिनिलीयाने ‘वेड’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ३० डिसेंबरला त्यांचा हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अशोक सराफ, शुभांकर तावडे हे कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती जिनिलीयाने केली आहे तर दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं आहे.