अभिनेता रितेश देशमुख सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. महिन्याभरापूर्वीच प्रदर्शित झालेला त्याचा ‘वेड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. आतापर्यंत या चित्रपटाने ७० कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असताना रितेश देशमुख आता एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.
रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलीया देशमुख सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. दोघंही अनेकदा सोशल मीडियावर रील्स शेअर करताना दिसतात. इन्स्टाग्रामवरही त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. नुकताच रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे.
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना रितेशने लिहिलं, “लग्नाबद्दल माझे विचार” या व्हिडीओच्या सुरुवातीला रितेश म्हणतो, “आयुष्यात तीन गोष्टी कधीच करू नका. पहिली गोष्ट म्हणजे घरच्यांच्या मर्जीने लग्न, दुसरी, स्वतःला आवडलेल्या व्यक्तीशी लग्न. तिसरी गोष्ट म्हणजे लग्न.” रितेश हे बोलत असतानाच त्याची पत्नी जिनिलीया त्याच्या मागे येऊन उभी राहते. त्यावर त्याचा चेहरा पाहण्यालायक होतो.
रितेशच्या या व्हिडीओवर अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “लग्न नाही केलं तरी नातेवाईक सुखाने जगू देत नाहीत रे रितेश दादा हे सगळं विनोदापुरतं छान वाटतं.” दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “हा व्हिडीओ शूट केल्यानंतर काय झालं ते आधी सांग.” आणखी एका युजरने लिहिलं, “नंतर फुल्ल राडा वहिनीचा.” दरम्यान रितेश देशमुखचा ‘वेड’ चित्रपट शाहरुख खानच्या ‘पठाण’लाही चांगलीच टक्कर देताना दिसत आहे.