अभिनेता रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिस गाजवताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी वाटचाल करत असताना रितेश देशमुखने चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे. या चित्रपटाचं नवं व्हर्जन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात रितेश-जिनिलीयाच्या एका रोमँटीक गाण्याचाही समावेश आहे.
रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याने चित्रपटात काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्यातच या नव्या गाण्याचा समावेश असून रितेशने या गाण्याची एक छोटीशी झलक एका व्हिडीओमधून शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे.
आणखी वाचा- ‘वेड’बाबत रितेश देशमुखची मोठी घोषणा; चित्रपटामध्ये होणार मोठे बदल, म्हणाला “२० जानेवारीपासून…”
‘वेड’ चित्रपटातील ‘वेड तुझा’ हे गाणं बरंच गाजलं. पण या चित्रपटात रितेश आणि जिनिलीया यांच्यावर एकही रोमँटीक गाणं चित्रित करण्यात आलं नाही अशी खंत अनेक प्रेक्षकांनी व्यक्ती केली होती. म्हणूनच रितेशने ‘वेड तुझा’चं नवीन व्हर्जनचा चित्रपटात समावेश करण्याचा निर्णय घेतला. या गाण्याची झलक इन्स्टाग्रामवर शेअर करताना रितेशने लिहिलं, “अनुभवा सत्या आणि श्रावणी च्या प्रेमाची जादू नव्या रुपात.”
दरम्यान ‘वेड’ चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबाबत रितेशने इन्टाग्राम लाइव्हद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांचे आभार मानले. याबरोबरच रितेशने चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. येत्या शुक्रवारपासून म्हणजेच २० जानेवारीपासून ‘वेड’ चित्रपटाचं नवीन व्हर्जन प्रदर्शित करण्यात येणार आहे. म्हणजेच चित्रपटातील एडिट केलेले काही सीन या चित्रपटात दाखवून ‘वेड’ पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.