एखादा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला की मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रिन्स न मिळणं हा मुद्दा बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतो. मराठी चित्रपटांना प्राईम टाइम शो व स्क्रिन्स मिळत नाहीत याबाबत अनेक चर्चाही रंगतात. शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अशाच काही चर्चा रंगल्या होत्या. रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाला शाहरुखच्या चित्रपटाचा फटका बसणार असं बोललं जात होतं. पण प्रत्यक्षात काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘पठाण’ने तीन दिवसांमध्येच जगभरात कमावले इतके कोटी, खरी आकडेवारी समोर
शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसांमध्येच या चित्रपटाने जगभरात ३०० कोटी रुपयांपर्यंत कमाई केली. दरम्यान या चित्रपटाआधीच रितेशचा मराठी ‘वेड’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या कमाईमध्ये घसरण होणार असं बोललं जात होतं.

पण आता चित्रपट प्रदर्शित होऊन चार आठवडे उलटले असले तरी ‘वेड’ची क्रेझ काही कमी झालेली नाही. रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ‘वेड’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. या चित्रपटाने चौथ्या आठवड्यामध्ये ६ कोटी ११ लाख रुपये कमाई केली आहे. तर प्रदर्शनाच्या पाचव्या शुक्रवारी २४ लाख रुपयांची कमाई केली.
आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य, म्हणाल्या, “तो भारताचा…”
आतापर्यंत ‘वेड’ने ५७ कोटी १५ लाख रुपयांची कमाई केली आहे. रितेशने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार ‘पठाण’चा या चित्रपटावर कोणताच परिणाम झाला नसल्याचं दिसून येत आहे. अजूनही हा चित्रपट कमाई करत असल्याचं रितेशने त्याच्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. आता ‘वेड’ची कमाई आणखी किती वाढणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.