मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख लोकप्रिय आहे. राजकीय वारसा लाभलेल्या रितेशने मात्र कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटातून रितेशने २००३ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘अपना सपना मनी मनी’, ‘हाऊसफूल’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांत त्याने काम केलं. हिंदीबरोबरच मराठी चित्रपचसृष्टीतही त्याने अभिनयाचा ठसा उमटवला.
रितेशने ‘लय भारी’ चित्रपटातून मराठी कलाविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘माऊली’ चित्रपटातही तो झळकला. गेल्या काही दिवसांपासून रितेश त्याच्या ‘वेड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच रितेशला ‘लोकमत’कडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला रितेशने पत्नी जिनिलीया व आईसह हजेरी लावली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या पुरस्कार सोहळ्यात पत्नीसह उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्या हस्ते रितेशला पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर रितेशने भर कार्यक्रमात सगळ्यांसमोरच राज ठाकरेंचे आभार मानले. रितेश म्हणाला, “राज ठाकरे यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला. त्यांचे मी आभार मानतो. तुम्ही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहात. पण, माझ्यासाठी आपली मैत्री फार जवळची आहे. मी आयुष्यभर आपली मैत्री जपेन.”
हेही वाचा>> समांथाचा जबरा फॅन! चाहत्याने प्रेमापोटी गावात बांधलं अभिनेत्रीचं मंदिर
रितेशने २०१२ साली बॉलिवूड अभिनेत्री जिनिलीया देशमुखशी विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत. रितेश व जिनिलीया कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.