मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या घरातून तब्बल १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने व रोख लंपास करण्यात आले. घरी काम करणाऱ्या महिलेनेच ही चोरी केल्याची बाब उघडकीस आली आहे. पुष्करने उषा गंगुर्डे आणि भानुदास गंगुर्डे या दाम्पत्याविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या एफआयआरमधील माहितीनुसार, विले पार्ले ईस्टमध्ये राहणाऱ्या पुष्कर श्रोत्रीच्या घरात कामासाठी आणि वडिलांची काळजी घेण्यासाठी मदतनीस होते. त्यापैकी एक उषा गंगुर्डे (वय ४१) ही मागच्या ५-६ महिन्यांपासून सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत काम करायची. तिने पुष्करच्या घरातून १.२० लाख रुपये रोख, ६० हजार रुपयांचे परकीय चलन चोरले. २२ ऑक्टोबर रोजी पुष्करची पत्नी प्रांजलला उषावर संशय आला आणि तिने पोलिसांना याबाबत माहिती दिली. तपासादरम्यान उषाने पैसे चोरल्याची कबुली दिली. चोरलेले पैसे पती भानुदास गंगुर्डेला दिल्याचं तिने सांगितलं. त्यानंतर तिच्या पतीनेही चोरीची कबुली दिली.
दरम्यान, या घटनेच्या दोन दिवसांनी २४ ऑक्टोबर रोजी प्रांजलने कपाटातून सोन्याचे दागिने बाहेर काढले पण तिला तिथेही गडबड जाणवली. श्रोत्री कुटुंबाने सोन्याचे दागिने त्या सोनाराच्या दुकानात नेले जिथून त्यांनी खरेदी केले होते. तेव्हा ते दागिने बनावट असल्याचं उघड झालं. त्यानंतर, तपासणी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. पैसे चोरणाऱ्या उषाने घरातील सोन्याचे दागिने चोरून त्याजागी हे बनावट दागिने कपाटात ठेवले होते. दागिने व पैसे असा एकूण १०.२७ लाख रुपयांचा ऐवज उषा व तिच्या पतीने चोरी केला.
चोरीचा हा प्रकार कळताच पुष्कर श्रोत्रीने २६ ऑक्टोबर रोजी विले पार्ले पोलीस स्टेशनमध्ये उषा व तिच्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. भारतीय दंड संहितेच्या कलम ३४, ३८१, ४०६ आणि ४२० अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.