केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट २०२३ ला प्रदर्शित झाला होता. सहा बहिणींची गोष्ट सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ‘सैराट’ चित्रपटानंतर सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. आता या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या रोहिणी हट्टंगडी यांनी ‘बाईपण भारी देवा’ सिनेमा रिलीज झाल्यानंतरची आठवण एका मुलाखतीत सांगितली आहे.
काय म्हणाल्या रोहिणी हट्टंगडी?
रोहिणी हट्टंगडी यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ‘बाईपण भारी देवा’ हा त्यांचा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला, त्यानंतरची आठवण सांगितली आहे. त्यांनी म्हटले, “तो सिनेमा जेव्हा आला, तेव्हा एक छान गोष्ट एवढंच डोक्यात होतं आणि केदार करतोय म्हणजे तो काहीतरी चांगलं करेल, असं वाटलं होतं. सुचित्राबरोबर एकदा काम केलं होतं, बाकी सगळ्या मला माहीत होत्या, त्यामुळे ती मजा येणार हे आम्हाला माहीत होतं. चांगली फिल्म झालेली आहे, फक्त लोकांना आवडायला पाहिजे असं वाटत होतं.”
पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “फिल्म पाहिली तेव्हा सगळ्यांना आवडेल असं वाटलं होतं. दुसऱ्या दिवशी थिएटरला भेट द्यायची होती. त्याआधीचे आमचे अनुभव असे होते की, कोणत्या तरी मराठी सिनेमाची तिकिटे मागितली की तो शो कॅन्सल झाला आहे, असं सांगितलं जायचं. असं माझ्याबाबतीत दोनदा झालं होतं. एकदा तर आम्ही तीन जण गेलो होतो, सहा तिकिटं घेतली होती. त्यानंतर तो शो चालू करायला सांगितलं होतं, इथंपर्यंत वेळ आली होती; तर ‘बाईपण भारी देवा’ सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला होता. शनिवारी आम्ही थिएटरला भेट द्यायला गेलो होतो. मी प्रेक्षकांना म्हटलं होतं की हीच गर्दी तुम्ही सोमवारी, मंगळवारी दाखवा म्हणजे या लोकांची हिंमत होणार नाही आमचा शो कॅन्सल करायची, असं बोललेलं मला आठवतंय.”
“बाईपण भारी देवा चित्रपटाला लोकांचा खूप प्रतिसाद मिळाला. ट्रक भरभरून लोक चित्रपट पाहायला येत होते. गॉगल लावून लोक फोटो काढत होते. सुकन्याला कोणाचातरी फोन आला होता की, अहो त्यांना सांगा आमच्याकडे पोस्टर पाठवायला, आम्हाला फोटो काढायचे आहेत. आम्हाला प्रेक्षकांकडून गिफ्टदेखील मिळाले. ते सगळं अकल्पनीय होतं. याचा फायदा नंतरच्या चित्रपटांनादेखील झाला”, अशी आठवण रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितली आहे.
दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी यांच्याबरोबरच सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते, दीपा परब, शिल्पा नवलकर, सुकन्या कुलकर्णी या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसल्या आहेत.