मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच महिलाप्रधान चित्रपटांना प्राधान्य देण्यात आले आहे. महिलांशी निगडीत असलेल्या विविध मुद्द्यांवर तसेच विविधांगी विषयांवर आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अशाच एका आगामी मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. एका महत्त्वपूर्ण विषयावर आधारलेल्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे नाव आहे ‘राजा येईल गं’. परिपूर्ण मनोरंजन करणारा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत एक अनमोल संदेशही पोहोचवणार आहे. या चित्रपटात ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री झळकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅरीसमा २४ सिने या बॅनरखाली ‘राजा येईल गं’ या चित्रपटाची निर्मिती केली जाणार असून थ्री डॉट्स स्टुडिओजचे आनंद तांबोळी, नेहा टकले, खिंजल फिल्म्सचे चंद्र मोहन दीक्षित या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘राजा येईल गं’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रविसुमन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ‘राजा येईल गं’ ही कथा आहे स्त्रीजन्माची… एका आईची… दोन मैत्रीणींची… स्त्रीने सोसलेल्या दु:खाची… तिच्या प्रेरणादायी संघर्षाची… नाट्यमय वळणं असलेली ही कथा एकीकडे नात्यांची गोष्ट सांगणार आहे. तर दुसरीकडे समाजातील ज्वलंत मुद्द्यांवरही प्रकाश टाकणार आहे. सुमधूर गीत-संगीताच्या जोडीने हा प्रवास संगीतमय करण्याचा दिग्दर्शक रविसुमन यांचा प्रयत्न राहणार आहे.

हेही वाचा – Video: अंबानींच्या होणाऱ्या सूनेचा शाहरुख खानसह ‘छम्मक छल्लो’ गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले, “राधिका…”

या चित्रपटाबाबत रविसुमन म्हणाले की, या चित्रपटातील व्यक्तिरेखांमध्ये प्रेक्षकांना विविध छटा दिसतील. चित्रपट पाहताना कुठे ना कुठे त्यांना आपलं प्रतिबिंब पडद्यावर पाहायला मिळेल. एक सुरेख गोष्टीच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा चित्रपट एक महत्त्वपूर्ण संदेशही जनमानसापर्यंत पोहोचवणार आहे. घोषणेनंतर लगेचच या चित्रपटाची पुढील कामे वेगात सुरू करण्यात येणार असून कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून चित्रीकरणाला सुरुवात करण्याचा निर्मात्यांचा मानस असल्याचंही रविसुमन यांनी सांगितलं.

हेही वाचा – शिवानी बावकर: मालिकाविश्व गाजवणाऱ्या शितलीच्या नजरेतला महिला दिन

‘राजा येईल गं’ या चित्रपटात ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री रुचिरा जाधव मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासाथीला कोणकोणते कलाकार दिसणार? हे लवकरच समजणार आहे. मूळ कथा नेहा टकले यांची असून रविसुमन यांनीच सहनिर्मात्या नेहा टकले यांच्या साथीने चित्रपटाची कथा लिहिली असून, पटकथा व संवादलेखन रविसुमन यांनीच केले आहे. लेखन-दिग्दर्शनासह रविसुमन यांनी निलेश गमरे यांच्या साथीने गीतलेखन केलं असून, ही गीते संगीतकार विशाल बोरुळकर यांनी संगीतबद्ध केली आहेत. प्रग्नेश दवे व निलेश गमरे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruchira jadhav will be seen in the lead role of raja yeil ga movie announced on international womens day pps
Show comments