भारतीय रसिकांमध्ये क्रिकेटचे वेड काहीही केलं तरी कमी होत नाही. चाहते हे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूसाठी काय करतील याचा काही नेम नाही. त्यातही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची गोष्ट काही औरच… ‘अश्वमेध मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘तेंडल्या’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘तेंडल्या’ या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात लहान मुलगा बॅट घेण्यासाठी हट्ट करताना दिसत आहे. “मला कंपास वैगरे काय नको, मला बॅट हवी”, असे तो सांगतो. त्यानंतर त्याची आई त्याला धपाटे देते. यानंतर भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी सुरु असलेली धावपळ, लहान मुलांची भारताच्या टीममध्ये जागा मिळवण्यासाठीचा सराव आणि घरात टिव्हीवर सामना पाहता यावा यासाठीची धडपड यात दिसत आहे.
आणखी वाचा : करोनापूर्वी निर्मिती झालेल्या ‘तेंडल्या’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, वाचा सचिन तेंडुलकर काय म्हणाला?
‘तेंडल्या’ या चित्रपटाची कथा ही खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांचं सचिन तेंडुलकरवर असणारं प्रेम आणि क्रिकेट यावर अवलंबून आहे. या चित्रपटाला पाच राज्य आणि एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाची निर्मिती करोना काळापूर्वी झाली होती. २४ एप्रिल २०२० रोजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रखडलं.
आणखी वाचा : “माझे जाडेपण…” वजनावरुन खिल्ली उडवणाऱ्यांना विशाखा सुभेदारने दिलेले सडेतोड उत्तर
येत्या ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात झळकणारे कलाकार शूटिंगच्या वेळी ११ वी आणि १२ वी पर्यंत शिक्षण घेत होते. यात ओंकार गायकवाड, स्वप्नील पाडळकर, राज कोळी, हर्षद केसरे, महेश जाधव, आकाश तिकोटी हे कलाकार दिसणार आहे.