१९ वर्षांनंतर ‘नवरा माझा नवसाचा २’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्यामुळे एक वेगळी उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची ५ फेब्रुवारीला निर्माते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी घोषणा केली. तेव्हापासून सोशल मीडियावर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातील डायलॉग्स आणि गाण्यांचे रील्स व्हायरल होत आहेत. अशातच सचिन पिळगावकर यांनी ‘नवरा माझा नवसाचा २’ कधी प्रदर्शित होणार? हे जाहीर केलं आहे.
२००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. अजूनही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. चित्रपटातील गाणी असो, डायलॉग असो किंवा भूमिका आजही त्यावर मराठी रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. त्यामुळेच ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाविषयी उत्कंठा वाढली आहे. ५ फेब्रुवारीपासून या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. प्रेक्षक आता हा चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच सचिन पिळगावकर यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत भाष्य केलं आहे.
हेही वाचा – ‘रसोडे में कौन था?’ फेम यशराज मुखाटे अडकला लग्नबंधनात, फोटो शेअर करत म्हणाला, “आज दोन मोठ्या…”
काल, (२८ जानेवारी) अभिनेत्री पूजा सावंत हिचा मोठ्या थोटामाटात लग्नसोहळा पार पडला. सिद्धेश चव्हाणशी पूजाने लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला मराठीतील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. सचिन पिळगांवकर यांनी देखील पूजाच्या लग्नाला खास उपस्थिती लावली होती. यादरम्यान माध्यमांशी बोलताना सचिन पिळगांवकर यांनी ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट सांगितली. ते म्हणाले की, मी ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. तुमच्या शुभेच्छा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत यावर्षी चित्रपट प्रदर्शित होणार. पण गणपतीच्या आशीर्वादने. जर त्याचा आशीर्वाद असला तर याच वर्षी चित्रपट प्रदर्शित होणार.
दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.