अभिनेता पुष्कर जोग अभिनयाबरोबर उत्तम दिग्दर्शन करताना दिसत आहे. नुकताच पुष्करने दिग्दर्शित केलेला ‘हार्दिक शुभेच्छा…पण त्याचं काय?’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. २१ मार्चला प्रदर्शित झालेल्या पुष्करच्या या चित्रपटात हेमल इंगळे, विशाखा सुभेदार, पृथ्वीक प्रताप, विजय पाटकर, अनुष्का सरकटे, किशोरी अंबिये असे अनेक कलाकार मंडळी झळकले आहेत. याच चित्रपटावर प्रतिक्रिया देत सचिन पिळगांवकर यांनी पुष्कर जोगचं भरभरून कौतुक केलं.
माध्यमांशी संवाद साधताना सचिन पिळगांवकर म्हणाले, “सर्व प्रथम मी जोग सरांचे आभार मानू इच्छितो. जोग सर म्हणजे पुष्करचे वडील. जे आज आपल्यात नाहीयेत. पण त्यांचे आशीर्वाद पुष्करबरोबर कायम राहतील. जोग कुटुंबियांबरोबर पिळगांवकरांचं खूप घनिष्ठ नातं आहे. ते वर्षानुवर्षे आहे. जोग सरांमुळेचं पुष्कर माझ्या संपर्कात आला. तेव्हापासून तो माझ्याबरोबर आहे. जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा मी याला मार्गदर्शन करत आलो आहे. माझ्या डोळ्यासमोर हा मोठा झालाय आणि आजही माझ्या डोळ्यासमोर मोठा होतोय. हा त्याचा दिग्दर्शक म्हणून पाचवा चित्रपट आहे. त्याला प्रेक्षकांनी हार्दिक शुभेच्छा द्याव्यात आणि फक्त हार्दिक शुभेच्छा देऊन थांबू नये. तर घरातून बाहेर पडून सिनेमागृहात जाऊन तिकिट काढून हा चित्रपट पाहावा. राज्यातल्या, देशातल्या आणि परदेशातल्या सर्व मराठी प्रेक्षकांना आवाहन करीन की, हा चित्रपट तुम्ही आवश्य पाहावा. कारण मराठी माणूसचं मराठी चित्रपट मोठा करू शकतो आणि मराठी माणूस ते करणार याची मला खूप खात्री आहे.”
पुढे सचिन पिळगांवकर पुष्करला म्हणाले की, तुला मी फक्त हार्दिक शुभेच्छा नाही देत तर तुला शुभाशीर्वाद देतो. याचा अर्थ पुढच्या चित्रपटाचं नाव शुभाशीर्वाद ठेऊ नको. मी तुझ्याबरोबर आहे, तुझ्याबरोबर होतो आणि तुझ्याबरोबर नेहमी असणार आहे. असाच काम करत राहा. पटापट चित्रपट करत राहा. हा काय करतो ते देवाला माहीत. मी तर इतकी वर्षे इंडस्ट्रीत आहे. पण इतक्या पटापट चित्रपट नाही बनवू शकतं. हा बाबा बनवतो. याच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. यासाठी मी तुझ्याबरोबर एकदा बसेन. कसा काय तू इतक्या पटापट चित्रपट करतोस यावर चर्चा करू. कारण सगळे कलाकार पण तुझ्याबरोबर काम करायला उत्सुक असतात. मला पण एकदा तुझ्या चित्रपटात घे. त्यामुळे बघता येईल तू कसा इतक्या लवकर चित्रपट करतोस. असं पण नाही गरीब चित्रपट बनवतो. याचा चित्रपट कधी गरीब नसतो याचा चित्रपट श्रीमंत असतो. श्रीमंती पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतं. त्यामुळेच तुझे चित्रपट लोकांना आवडतात. नेहमी काहीतरी वेगळा प्रयत्न करत असतो. एक वेगळा विचार देण्याचा प्रयत्न करत असतो.
“तू लहान मुलीबरोबर ‘बापमाणूस’ चित्रपट केला होता. ज्यामध्ये तू सुंदर रित्या बाप-मुलीचं नातं दाखवलं होतंस. असेच चित्रपट करत राहा. वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनवत राहा. आम्ही सर्वजण तुझ्याबरोबर आहोत. ऑल द वेरी बेस्ट,” असं सचिन पिळगांवकर म्हणाले. त्यानंतर पुष्कर सचिन पिळगांवकरांच्या पाया पडला.