चांद्रयान -३ ने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करत इतिहास रचला. भारताच्या चांद्रयान मोहिमेला यश आलं असून संपूर्ण देश या यशाचा आनंद साजरा करत आहेत. सोशल मीडियावर फक्त चांद्रयान-३चीच चर्चा आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तसेच मराठी कलाकारांनीही पोस्ट शेअर करत या अद्भुत कामगिरीबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं आहे.
नुकतंच मराठी चित्रपटसृष्टीतील महगुरू सचिन पिळगांवकर यांनीदेखील याच निमित्ताने एक वेगळी पोस्ट शेअर केली आहे जी चांगलीच चर्चेत आहे. सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या अजरामर अशा ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातील अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक फोटो शेअर केला आहे. चित्रपटात पार्वती हे स्त्रीपात्राच्या डोहाळे जेवणादरम्यानच्या सीनमधील एक फोटो त्यांनी शेअर केला आहे.
आणखी वाचा : नितेश तिवारींच्या रामायणामधून आलिया भट्टने घेतला काढता पाय; नेमकं कारण आलं समोर
या फोटोमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे पार्वतीच्या वेशात चंद्रावर बसलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना सचिन पिळगांवकर यांनी लिहिलं, “चंद्रावर बसणारा पहिला भारतीय.” सोशल मीडियावर या फोटोची चांगलीच चर्चा होत आहे. ‘अशी ही बनवाबनवी’मध्ये सचिन यांच्यासह लक्ष्मीकांत बेर्डे यांनीही स्त्रीपात्र साकारलं होतं. या दोघांच्या कामाचं त्यावेळी प्रचंड कौतुक झालं होतं.
हा फोटो पाहून बऱ्याच लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी इस्रो आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची तुलना केल्यावरुन सचिन पिळगांवकर यांना ट्रोल केलं आहे, तर काहींनी त्यांच्या या चित्रपटाशी जोडलेल्या आठवणींना उजाळा दिला आहे. हा चित्रपट आणि यातील प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या मनाच्या इतक्या जवळ आहे ते या पोस्टवरील कॉमेंटवरुन स्पष्ट होत आहे.