Sachin Pilgaonkar : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगांवकरांना या इंडस्ट्रीत ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती. सचिन पिळगांवकर यांनी बालकलाकार म्हणून जवळपास ६५ चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. हळुहळू मराठीसह हिंदी कलाविश्वात देखील त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. पुढे, त्यांनी मनोरंजन विश्वातच आपलं करिअर घडवायचं ठरवलं.

‘अशी ही बनवाबनवी’ या सचिन पिळगांवकरांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमाचं नाव मराठी कलाविश्वात सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं आहे. ‘आयत्या घरात घरोबा’, ‘गंमत जंमत’, ‘माझा पती करोडपती’, ‘नवरा माझा नवसाला’, ‘आम्ही सातपुते’ अशा असंख्य चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. याशिवाय सचिन पिळगांवकरांनी ‘एकापेक्षा एक’ या डान्सिंग शोमध्ये मुख्य परीक्षकाची जबाबदारी सांभाळली होती. हा शो सर्वत्र सुपरहिट झाला होता. या शोमध्ये त्यांना ‘महागुरू’ असं संबोधलं जायचं.

‘महागुरू’ या नावावरून अलीकडच्या काळात त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. याबद्दल सचिन पिळगांवकरांनी काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत ट्रोलर्सना थेट उत्तर देत “मी स्वत:ला महागुरू समजत नाही” असं म्हटलं आहे.

सचिन पिळगांवकर म्हणाले, “महागुरू हे नाव म्हणा, पदवी म्हणा किंवा काहीही म्हणा… ते नाव ‘झी मराठी’ वाहिनीने मला दिलेलं आहे. मी स्वत:हून हे नाव घेतलेलं नाही. मी स्वत:ला ‘महागुरू’ समजत नाही आणि मानतही नाही. मी स्वत:ला जर काही समजत असेन, तर मी कुटुंबप्रमुख समजतो. मला त्या लोकांनी पटवून दिलं होतं की, आपण ‘महागुरू’ नाव ठेऊया. पण, मी त्यांना म्हटलं होतं की, आपण ‘कुटुंबप्रमुख’ म्हणूयात.”

“त्या कार्यक्रमात डान्स करणाऱ्या मुलांचे गुरू सुद्धा असणार होते. डान्स शिकवणाऱ्या कोरिओग्राफर्सना ती मुलं गुरू म्हणत होती, त्यामुळे ‘झी मराठी’ने मुख्य परीक्षकाला महागुरू नाव ठेवायचं असा निर्णय घेतला. ते गुरू… तुम्ही पण गुरू असं दोन्ही सारखंच होईल. म्हणून तुम्ही ‘महागुरू’ असं त्यांनी मला सांगितलं. पण, शूटिंगमध्ये मी कधीच कोणाला मी महागुरू आहे असं सांगितलेलं नाही. मी स्वत:चा उल्लेख नेहमी कुटुंबप्रमुख असात केला आहे.” असं सचिन पिळगांवकरांनी स्पष्ट केलं.

सुप्रिया पिळगांवकर याविषयी म्हणाल्या, “महागुरू ही पदवी वगैरे काही नाही. बरं हे लोक या नावावरून काहीतरी घाणेरडं बोलतात, ट्रोल करतात. हे सगळं कशासाठी करतात कारण, त्यांच्या प्रतिक्रियेवर अजून शंभर लोक बोलतील. पण ते नाव वाहिनीकडून देण्यात आलं आहे. ते स्वत:ला असं कधीच समजत नाहीत.”