माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने निर्मित ‘पंचक’ चित्रपटाचा सध्या सर्वत्र बोलबोला सुरू आहे. ५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सतीश आळेकर, भारती आचरेकर, आदिनाथ कोठारे, आनंद इंगळे, सागर तळाशीकर, तेजश्री प्रधान, दीप्ती देवी, आरती वडगबाळकर, नंदिता पाटकर, गणेश मयेकर अशी तगडी कलाकार मंडळी असलेल्या या चित्रपटाची कथा रसिक प्रेक्षकांना आवडली आहे.
‘पंचक’ची कथा कोकणातील खोत कुटुंबावर आधारित आहे. जयंत जठार व राहुल आवटे यांनी उत्तमरित्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांसह अनेक कलाकार मंडळी चित्रपटाचं कौतुक करत आहेत. नुकतंच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘पंचक’ चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा – प्रेमाची गोष्ट: सईच्या कस्टडीची केस हरल्यानंतर सावनीची इंद्रा कोळीबरोबर धमाल, व्हिडीओ व्हायरल
सचिनने फेसबुकवर ‘पंचक’चं पोस्टर शेअर करत चित्रपटाचं कौतुक केलं आहे. एवढंच नाहीतर त्याने माधुरी दीक्षित व श्रीराम नेने यांचे आभार मानले आहेत. सचिन म्हणाला, “अनेक कॅरेक्टर्स आणि त्याहूनही जास्त विनोदी. ‘पंचक’ हा फॅमिली बरोबर बघण्यासारखा आणि खूप खूप हसवणारा चित्रपट आहे. दिलीप प्रभावळकरांची अॅक्टिंग चित्रपटाला अजून समृद्ध करते. निर्माते माधुरी दीक्षित-नेने आणि डॉक्टर श्रीराम नेने यांना मराठी सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी धन्यवाद…”
सचिनच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊल पडला आहे. एका नेटकऱ्याने लिहिल, “एका मराठी व्यक्तीने दुसऱ्या मराठी व्यक्तीचं व्यावसायिक कौतुक केलं हे बहुदा प्रथमच घडत असावं…” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिल, “खूप छान असंच एका मराठी व्यक्तीने मराठी व्यक्तीला सपोर्ट करत राहा.” अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया सचिनच्या पोस्टवर दिल्या आहेत.