नाटका, मालिका, चित्रपटात या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवलेल्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सागर देशमुख. विविधांगी भूमिका साकारून सागरने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लवकरच तो अभिनेत्री स्पृहा जोशीबरोबर नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘कलर्स मराठी’वरील ‘सुख कळले’ या नव्या मालिकेत सागर व स्पृहा ही नवी जोडी झळकणार आहे. त्यानिमित्ताने सागरने नुकताच ‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधला. यावेळी त्याने एक धक्कादायक प्रसंग सांगितला.

सागर देशमुखला विचारलं गेलं होतं की, आयुष्यात तुला ‘सुख कळले’ असं केव्हा वाटलं? तेव्हा सागर म्हणाला, “मी सगळ्यात गंभीर प्रसंग सांगतो. आम्ही जेव्हा ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ चित्रपटाचं शूटिंग करत होतो आणि जवळपास ९० टक्के चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं होतं. त्यावेळेला माझा अपघात झाला होता. म्हणजे मला हृदयविकाराचा झटका आला होता. माझी अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली आणि दोन-तीन दिवस मी खूप गंभीर होतो. यावेळेला माझी बायको प्राजक्ता, माझ्या आजूबाजूची लोक म्हणजे आशिष मेहता, सारंग साठ्ये, नेहा जोशी, ओमकार कुलकर्णी, मी आता शंभर नाव घेऊ शकतो, पर्ण पेठे, मृण्मयी गोडबोले…त्या प्रसंगात ही सगळी लोकं माझ्या आजूबाजूला तटबंदी करून उभी होती.”

हेही वाचा – Video: कोणाला मारलं डोक्यात, तर कोणाला दिला दम; जॅकी श्रॉफ यांनी चाहत्यांना दिलेली वागणूक पाहून भडकले नेटकरी, म्हणाले…

पुढे सागर म्हणाला, “त्यावेळेला जे मी अनुभवलंय, ज्या पद्धतीचं प्रेम, सकारात्मक ऊर्जा मिळाली. त्याच्यातून मी बाहेर आलो आहे. माझ्या आयुष्यामध्ये पैसा आडका किंवा मटेरिअलिस्टिकचं सुख याच्यापेक्षा माणसांचं असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळेला मला वाटलं, सुख कळले. कारण की, या लोकांमुळे मला नवीन जन्म मिळाला. त्यामुळे मी ही मालिका करू शकतोय. माझ्यातली कला मी आणखी चांगल्या पद्धतीने जोपासू शकतोय. माणूस म्हणून किंवा कलाकार म्हणून जी माझी वाढ होतेय, ही केवळ या माणसांमुळे होऊ शकतेय.”

हेही वाचा – शशांक केतकरच्या ‘मुरांबा’ मालिकेचा हिंदीत रिमेक, प्रोमो पाहून म्हणाला, “व्वा आमच्या…”

दरम्यान, सागर देशमुखने ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटात पु.ल. देशपांडे यांची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. त्याच्या कामाचं खूप कौतुक करण्यात आलं होतं. आता सागरची नवी मालिका ‘सुख कळले’ २२ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत सागर, स्पृहा व्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, बालकलाकार मिमी खडसे, स्वाती देवल, स्वराध्य देवलसह बरेच कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. अद्याप मालिकेची वेळ जाहीर करण्यात आलेला नाही.

Story img Loader