“कांदेपोहे…” हे गाणं ऐकलं तरी सई ताम्हणकर आणि श्रेयस तळपदे या जोडीची अफलातून केमिस्ट्री प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येते. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सनई चौघडे’ या चित्रपटात सई-श्रेयसने एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या आठवणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. ‘सनई चौघडे’ प्रदर्शित झाल्यावर आज तब्बल १६ वर्षांनी मराठी सिनेप्रेमींना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर सई आणि श्रेयसला एकत्र पाहायला मिळणार आहे. यामागे नेमकं काय कारण आहे जाणून घेऊयात…
सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू असून नुकतंच या चित्रपटातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्याचं नाव “दिल मैं बजी गिटार…” असं आहे.
२००६ मध्ये प्रदर्शित झालेला बॉलीवूड चित्रपट ‘अपना सपना मनी मनी’ या हिंदी चित्रपटातील ‘गिटार साँग’चं हे मराठी व्हर्जन करण्यात आलेलं आहे. ‘अपना सपना मनी मनी’मध्ये रितेश देशमुख व श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यामुळे ‘गिटार साँग’च्या मराठी रुपांतरात देखील प्रेक्षकांना श्रेयसची झलक पाहायला मिळाली आहे.
हेही वाचा : “मागच्या १४ वर्षात…”, शशांक केतकरने खरेदी केली इलेक्ट्रिक कार, किंमत माहितीये का?
“दिल मैं बजी गिटार…” गाणं संपताना प्रेक्षकांना श्रेयस तळपदेच्या रुपात शेवटी एक खास सरप्राईज मिळतं. या गाण्यावर शेवटी श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर एकत्र मिळून थिरकले आहेत. यानिमित्ताने तब्बल १६ वर्षांनी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा सई-श्रेयसची जोडी पाहायला मिळाली. लाडक्या जोडीला ऑनस्क्रीन एकत्र पाहून चाहते देखील आनंद व्यक्त करत आहेत.
दरम्यान, सई व सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये सिद्धार्थ-सईबरोबर जय मोने, शुभांगी गोखले, समीर खांडेकर, रसिका सुनील, वंदना सरदेसाई, पूजा वानखडे, रमाकांत डायमा, सुलभा आर्या, पल्लवी परांजपे, सिद्धार्थ महाशब्दे, सिद्धार्थ बोडके, जियांश पराडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.