मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सई ताम्हणकर हीचं नाव कायमच वरच्या स्थानी असतं. फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही तिने तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ती तिच्या कामांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील चांगलीच चर्चेत असते. अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आता यावर तिने तिचं स्पष्ट मत मांडलं आहे.
सई ताम्हणकरचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या मराठी अभिनेत्रींपैकी ती एक आहे. सई सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे ग्लॅमरस फोटो सर्वांचंच लक्ष वेधून घेत असतात. तर तिच्या लूकमुळे तिला कधी कधी ट्रोलही केलं जात. आता या होणाऱ्या ट्रोलिंगकडे ती कशी बघते हे तिने सांगितलं आहे.
आणखी वाचा : प्रसाद ओक व सई ताम्हणकरला हात जोडून मागावी लागली माफी, नेमकं प्रकरण काय?
सईने नुकतीच ‘महाराष्ट्र टाइमस’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत ट्रोलिंगबद्दल बोलताना ती म्हणाली, “हल्ली कशाहीवरून ट्रोलिंग होतं. आपलं दिसणं, आपण परिधान केलेले कपडे, आपण मांडलेलं मत यावरून टीका केली जाते. पण आता ट्रोलिंग हा आमच्या व्यवसायाचा भाग आहे असं म्हणून आम्ही ते स्वीकारलं आहे. आज लोक खूप निष्ठुर आणि निर्दयी झाले आहेत. पूर्वी लोक आब राखून, विनम्रतेने व्यक्त होत असत. ते आता दिसत नाही.”
हेही वाचा : सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये झळकणार, ‘या’ सुपरस्टारबरोबर शेअर करणार स्क्रीन
पुढे ती म्हणाली, “समोरचा माणूस आक्षेपार्ह भाषेत बडबड करत असेल तर आपणही त्याला उत्तर द्यायचं का? अजिबात नाही..! त्याच्याकडे सरळ दुर्लक्ष करायचं आणि तसं मी करते. आपण आपली सद्सदविवेकबुद्धी शाबूत ठेवून ट्रोलिंगला सामोरं जायचं.” आता तिचं हे बोलणं खूप चर्चेत आलं असून तिच्या या विचारांचं, तिच्या संयमाचं नेटकरी कौतुक करत आहेत.