मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सई ताम्हणकर हिचं नाव कायमच वरच्या स्थानी असतं. आता फक्त मराठीतच नाही, तर हिंदी सिनेसृष्टीतही तिने तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही अनेकदा चर्चेत असते. तिचा मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि मनोरंजन सृष्टीतील अनेक आघाडीचे कलाकार तिचे खूप चांगले मित्र-मैत्रिण आहेत. यापैकीच एक म्हणजे सोनाली कुलकर्णी. परंतु सई ताम्हणकरने एकदा सोनाली कुलकर्णीला उपाशी ठेवल्याचं तिने कबूल केलं आहे.
‘झी मराठी’वर ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम काही दिवसांपूर्वी सुरू झाला. आतापर्यंत या कार्यक्रमांमध्ये अनेक राजकारणी, नेतेमंडळी यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली. आता या कार्यक्रमाच्या पुढील भागात अभिनेत्री सई ताम्हणकर पाहुणी कलाकार म्हणून उपस्थित राहणार आहेत. या भागातील एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. यामध्ये सईने सोनाली कुलकर्णीला उपाशी ठेवल्याचं म्हणत तेव्हा नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
आणखी वाचा : सई ताम्हणकरने थकवले मित्राचे हजारो रुपये, म्हणाली, “त्याच्या वशिल्याने मी…”
अवधूत गुप्तेने सई ताम्हणकरला विचारलं, “तू लोकांना घरी जेवायला बोलावतेस आणि तासंतास उपाशी ठेवतेस हे खरं आहे का?” त्यावर सई म्हणाली, “सोनाली कुलकर्णी च लग्न झाल्यावर मी तिला आणि तिच्या नवऱ्याला घरी जेवायला बोलावलं होतं. आम्ही घरी खूप टाईमपास करत होतो, मॅच बघत होतो. आम्ही गप्पांमध्ये आणि टाईमपास करण्यामध्ये इतके गुंतलो की मी दुपारचे जेवण बनवणार होते तो डिनर झाला.”
सई ताम्हणकरच्या या बोलण्याने आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिचा हा दिलखुलास अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला असून सर्वजण या आगामी भागाची उत्सुकता व्यक्त करताना दिसत आहेत.