बोल्ड, सुंदर व मराठी कलाविश्वातील दमदार अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखलं जातं. तिने मराठीसह बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या सई ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनेक वर्षांनी सिद्धार्थ-सईची जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने अभिनेत्रीने नुकतीच लोकमत फिल्मीच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी सईने वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील अनेक किस्से सांगितले.
मराठीशिवाय हिंदीमध्ये काम करताना कोणत्या सहअभिनेत्याने सर्वात जास्त सांभाळून घेतलं याबद्दल सांगताना सई ताम्हणकर म्हणाली, “पहिलं नाव घेईन मी गुलशन देवैयाचं आम्ही ‘हंटर’मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यात आमच्या दोघांच्या वाट्याला खरंच खूप कठीण सीन्स होते आणि मी दुसरं नाव घेईन विजय सेतुपती. त्यांच्याबरोबर मी ‘नवरसा’ चित्रपटासाठी काम केलंय. अर्थात ‘नवरसा’मध्ये काम करताना माझ्या भाषेची अडचण होती. मी पाठ केलेले सगळे संवाद ऐनवेळी बदलण्यात आले. त्यामुळे सेटवर मी अशीच मख्खपणे बसून होते…माझ्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. माझ्याशेजारी माझ्याच मैत्रिणीची भूमिका करणारी एक मुलगी बसली होती मी दिग्दर्शकला म्हटलं हिला माझा रोल दे…त्यावर तो पटकन “जस्ट डू युअर जॉब सई” असं मला म्हणाला. हे सगळं विजय सरांनी पाहिलं.”
सई पुढे म्हणाली, “माझ्यासमोर विजय सेतुपती बसलेत. तिसरा टेक झाला, तरी माझ्या तोंडून वाक्य निघत नाही. मला भयंकर दडपण आलं होतं. त्यावेळी विजय सर मला म्हणाले, काही काळजी करू नकोस. मी जेव्हा हिंदी बोलतो तेव्हा मलाही असंच दडपण येतं. त्यांनी मला एक ट्रिक सांगितली. विजय सरांनी सांगितल्याप्रमाणे मी सगळं ऐकलं आणि त्यानंतरचा दुसरा टेक माझा ओके झाला.”
“मराठीमध्ये मी ललित आणि अमेयचं नाव आवर्जून घेईन. ही दोघंही स्वत:पेक्षा एखाद्या प्रोजेक्टचा खूप जास्त विचार करतात. काही कलाकार दुसऱ्याचा क्लोज लागल्यावर वेगळं आणि स्वत:चा क्लोज लागल्यावर एकदम वेगळंच काम करतात असे ते दोघेही नाहीत. त्यामुळे मला त्या दोघांबरोबर काम करताना खूप समाधान वाटतं.” असं सईने सांगितलं.