मराठीमधील टॉपची अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वतःला कलाक्षेत्रामध्ये सिद्ध केलं. ती मराठी चित्रपटसृष्टीपुरताच मर्यादित राहिली नाही. तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही सई महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसते. सई तिच्या कामाबरोबरच फॅशन सेन्समुळेही चर्चेत राहिली आहे. फॅशनबाबत वेगवेगळे प्रयोग करणं तिला आवडतं. मात्र तिला बऱ्याचदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.
सई सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. वेस्टर्न असो वा पारंपरिक स्टाइलचे कपडे परिधान करुन ती सोशल मीडिया अकाऊंटद्वारे फोटो शेअर करताना दिसते. आताही तिने असेच काही फोटो पोस्ट केले आहेत. सईचे हे फोटो पाहून काहींनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
सईने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन खास फोटोशूट केलं. या फोटोंमध्ये तिच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे पडदे दिसत आहेत. यावरुनच ट्रोल करणाऱ्याला सईने अगदी सडेतोड उत्तर दिलं आहे. “पडदा व ड्रेस एकसारखाच वाटत आहे बरं का सई…” अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली. ही कमेंट पाहिल्यानंतर सईने त्याला रिप्लाय केला.
सई म्हणाली, “हो. अगदी बरोबर. त्याला टोन ऑन टोन असं म्हणतात”. सईने या फोटोशूटच्या रंगसंगतीला नेमकं काय म्हणतात? हे त्या ट्रोलर्सला एका वाक्यातच सांगितलं. तर चाहत्यांनी सईच्या सौंदर्याचं आणि तिच्या या पारंपरिक लूकचं भरभरुन कौतुक केलं आहे. पारंपरिक ड्रेसमध्ये सई अगदी उठून दिसत आहे.