मराठीबरोबर हिंदी सिनेसृष्टीतही सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर स्पष्टवक्ती आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल व चित्रपटांबाबत अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने घटस्फोट, घटस्फोटानंतर केलेली पार्टी आणि घटस्फोटानंतरचा अनुभव सांगितला आहे.
सई ताम्हणकरने ११ वर्षांपूर्वी २०१३ मध्ये व्हिज्युअल आर्टिस्ट अमेय गोसावीशी लग्न केलं होतं. मात्र हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही, लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांत सई व अमेयचा घटस्फोट झाला. २०१५ मध्ये सई व अमेय कायदेशीररित्या विभक्त झाले. या घटस्फोटाबद्दल सई काय म्हणाली जाणून घेऊयात.
‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सईला घटस्फोटानंतरच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आलं. त्याबद्दल सई म्हणाली, “सुरुवातीला सगळ्यांना कळतं ना की तुम्ही दुःखी आहात, तो एक टप्पा असतो १० वर्षे. मग १० वर्षांनंतर कदाचित फक्त आईला किंवा बाबालाच माहित असतं, मग कोणालाच माहित नाही असा टप्पा येतो. या सर्वांनंतर एक परिपक्वता येते की कोणत्या गोष्टीसाठी तुमच्या आई-वडिलांना त्रास द्यायचा आहे आणि कोणत्या गोष्टीसाठी नाही. पण माझ्या बाबतीत मीच घर चालवते. त्यामुळे मी माझी निराशा, राग, माझ्या समस्या आईला दाखवू शकत नाही, ते स्वातंत्र्य मला नाही. मी फार बोलत नाही पण माझ्या श्वासावरून आईला कळतं की मी खूश आहे की दुःखी आहे. तिला फोनवरही सगळं कळतं. मी तिच्याकडून काही लपवू शकत नाही.”
याच मुलाखतीत सईला नात्यातील फसवणुकीबद्दल विचारण्यात आलं. तुझी फसवणूक झाली होती का? यावर सई म्हणाली, “हो. मला वाटतं की लहान वयातच मी एक अत्यंत वाईट नात्यात होते आणि मी त्यातून खूप गोष्टी शिकले आहे.”
“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग
सईने घटस्फोटाच्या पार्टीचाही उल्लेख केला. “कोर्टातील सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर थोडं चिल करायचं होतं, त्यामुळे ड्रिंक्स घ्यायला बाहेर गेलो. तिथे रडारड झाली, थोडं प्रेमाने एकमेकांशी बोलणं आणि आयुष्यासाठी एकमेकांना सल्ले देऊन झालं. आमच्या घटस्फोटाबद्दल काही खूप जवळच्या मित्रांना माहित होतं, त्यामुळे ते आम्ही कसे आहोत हे जाणून घेण्यासाठी फोन करत होते. ज्यांचे ज्यांचे फोन आले, त्यांना आम्ही दोघांनी ‘आम्ही इकडे आहोत, तुम्ही या’ असं सांगितलं आणि ८-१० लोक जमले. मग आम्ही दारू प्यायलो आणि चांगला वेळ घालवला,” अशी आठवण सईने सांगितली.